मुंबई : नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून, या मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाले. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. याचमुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, मुंडे सर्मथकांच्या राजीनाम्याचे सत्र जोरदार सुरु झाले आहे. उद्या तर 400 ते 500 मुंडे समर्थक पंकजा ताईंना भेटून मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पंकजा मुंडे सध्या दिल्लीत असून, प्रितम मुंडे यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांनी सुरु केल्या आहेत. तसेच उद्या पंकजा मुंडे दिल्लीतून आल्यानंतर हे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजीनामा सत्र सुरुच
केंद्रीय मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बीडमधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा एकूण 36 जणांनी राजीनामा दिला आहे. तर आज 70 जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या होत्या?
गोपीनाथ मुंडे यांचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे. मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळं समर्थकांमध्ये नाराजीची भावना असेल हे मी नाकारू शकत नाही. मात्र, माझ्या मनात किंवा कुटुंबामध्ये तशी कुठलीही नकारात्मक भावना नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले होते. मुंडे कुटुंबाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते याबाबत काय वाटते असे विचारले असता पंकजा म्हणाल्या, 'असे काही मला वाटत नाही. मुंडे साहेबांचा प्रभाव फक्त मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातच नाही, देशातील अनेक भागांमध्ये आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न होतोय असे वाटत नाही आणि तसा तो झाला तर त्यांचा प्रभाव वाढेल असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
ख-या ओबीसी चेह-यावर अन्याय
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे, भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झाल्याची टीका त्यांनी केली आहे. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नसल्याचे म्हणत शेंडगे यांनी भाजपवर टीका केली आहे. अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, आज अचानक भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांना मंत्रिपद दिल्याने ओबीसी समाजाता नाराजी पसरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, आमच्या संस्कृतीला 'मी' पणा अमान्य' : पंकजा मुंडे
- मंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या, म्हणाल्या...
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे बीडमध्ये पडसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; जिल्हाध्यक्षांकडे 74 राजीनामे