अमरावती : 1936 च्या जागतिक ऑलिम्पिकमधलं 'हिटलर मेडल' आजही अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळकडे जसच्या तसं मोठ्या अभिमानाने जपून ठेवलं आहे. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 25 खेळाडूंच्या चमूने मलखांब क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करून ऑलिम्पिक पदक पटकावले होते. या पदकात नाझी चिन्हासह गरुड आणि स्वास्तिक चिन्ह दर्शवलेले आहे.


जर्मनीच्या बर्लिन ऑलिम्पिकशी अमरावतीसोबत एक आगळंवेगळं नात आहे. जागतिक कीर्तीचे हॉकीपटू ध्यानचंद यांनी यावेळी भारतासाठी गोल्ड मेडल आणलं होतं. त्याचवेळी सन 1914 मध्ये अमरावती येथे अनंत आणि अंबादास वैद्य यांनी स्थापन केलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 25 खेळाडूंच्या चमूने मलखांब, कबड्डी (हुतुतू) आदी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करून ऑलिम्पिक पदक पटकावले होते. या पदकात नाझी चिन्हासह गरुड आणि स्वास्तिक चिन्ह दर्शविलेले आहे. 


जागतिक शैक्षणिक परिषदेत शारीरिक संस्कृती प्रदर्शनात हा संघ दुसर्‍या स्थानावर होता. जेथे भारतासह अनेक राष्ट्रांनी त्यांचे स्वदेशी खेळ आणि कला दर्शवली होती. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या व्यायामशाळेने सन 1936 या वर्षी यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे (काणे) यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकसाठी जागतिक व्यायाम परिषदेला एक चमू पाठवली होती. तब्बल दीड ते दोन महिने आगबोटीने प्रवास करत ही चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचली होती. 




जर्मनीत भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये एचव्हीपीएमच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गोफण फिरवणे हे भारतीय व्यायाम प्रकार करून दाखवले, त्यावेळी त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर एडॉल्फ हिटलर, गोबेल्स हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळेसह भारतीय संघाला 'प्लॅटिनम मेडल आणि प्रशस्तीपत्र' देऊन सन्मानित केले होते. तत्कालीन भारतीय या संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनीत राहण्याचा इत्यंभूत खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. 


अमरावती येथील या व्यायामशाळेला वीर वामनराव जोशीं यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी, क्रांतिकारक राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती. सन 1989 या वर्षी 62 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते.