मुंबई : मोदींच्या मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Prital Munde) यांना संधी न मिळाल्याच्या मुद्द्यावर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मौन सोडलं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज बोलताना गोपीनाथ मुंडे यांची आठवण निघाल्यानंतर पंकजा मुंडेंना गहिवरुन आलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या इथे जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे, हे सांगताना पंकजा मुंडे गहिवरल्या. त्यांनी पुढं म्हटलं की, प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते, असं त्यांनी म्हटलं.
'भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, आमच्या संस्कृतीला 'मी' पणा अमान्य' : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि 3 जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. 17 दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे यांचा कंठ दाटून आला आणि डोळेही पाणावले.
मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय
पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो, असं पंकजा मुंडे म्हणतात. प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं, त्यांचं नाव योग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही, असं त्या म्हणाल्या. प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्या साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्यांनी म्हटलं की, मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाहीत. मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्वांचं अभिनंदन. मी स्वत: अनेकांचं फोन करुन अभिनंदन केलं आहे, असं त्यांनी म्हटलं. राजकारणात मी व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले. लोकांचं असलेलं नातं कधी तुटत नाही, असंही त्या म्हणाल्या.
भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही
मला टीम नरेंद्रमध्ये कोण आहे, टीम देवेंद्रमध्ये कोण आहे, याबाबत माहिती नाही. भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भाजपमध्ये राष्ट्रप्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमचं तत्व आहे. आमच्या संस्कृतीला मी पणा मान्य नाही. आपण, आम्ही असं म्हणणं आम्हाला मान्य आहे. त्यामुळं अशी कुठली टीम पक्षाला मान्य आहे असं मला वाटत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये वरिष्ठ चर्चा करुन निर्णय घेतात. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही. पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपला मला संपवायचं आहे असं मला वाटत नाही, असंही त्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.