बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 74 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह 3 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.


दरम्यान पंकजा मुंडे आज दिल्लीमध्ये गेल्यामुळे आणि कार्यकर्ते जे पंकजा मुंडे यांना भेटायला मुंबईला जाणार होते. त्यांनी आपला मुंबईचा दौरा स्थगित केला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी बारा वाजता पंकजा मुंडे यांच्या परळीतल्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची पंकजा मुंडे यांच्यासोबत भेट होणार आहे. 


दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 74 राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरु होताच जिल्ह्यातील 7 तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले होते.


प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असे अंदाज बांधले जात होते. ते अंदाज फोल ठरले मात्र अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी का दिली गेली? यावर अनेक तर्क लावले जात आहे. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात भागवत कराड हे मुंडे कुंटुबियांचे निकटवर्तीय मानले जातात.


पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?


भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं, त्यांचं नाव योग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्यांना साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या. माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :