मुंबई : साखर उद्योजक अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांच्या आयकर विभागाच्या धाडीनंतर  (IT Raids)  अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होणार का? ही चिंता सतावत असताना पाटील यांनी दोन वर्षांपासून अडकलेली कारखान्याच्या बिलांचे वाटप सुरु करत निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या चार खाजगी साखर कारखान्यावर छापेमारी केली . सलग तीन दिवसांच्या या छापेमारीमुळे अभिजित पाटील यांनी जिंकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा भोंगा वाजणार का हा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला होता.


 मात्र आज झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीत दोन वर्षांपासून अडकलेले 30 कोटीची थकीत बिले देऊनच कारखान्याचे गाळप सुरु करण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना हा सुखद धक्का बसला आहे. केवळ दोन महिन्यात पाटील यांनी दोन वर्षाची थकीत बिले देण्यास सुरुवात केल्याने यंदा कारखाना पुन्हा पूर्ववैभवाने चालेले असा विश्वास आता शेतकऱ्यांना वाटू लागला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि दोन वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे 650 कोटीच्या कर्जासोबत 20-21 सालात गाळप झालेल्या चार हजार शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत होती.


निवडणुकीच्यावेळी आधी शेतकऱ्यांची ऊसबिले , कामगारांचे वेतन देऊनच हंगाम सुरु करणार असल्याचे आश्वासन अभिजित पाटील यांनी दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव करीत शेतकऱ्यांनी अभिजित पाटील यांच्या पॅनलला मोठ्या फरकाने विजयी केले होते . कारखाना विजयानंतर अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र आजच्या बैठकीत अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची सर्व थकीत बिले देण्यास सुरुवात करत असल्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.


 सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केली असून कारखान्याची कामेही पूर्ण होत आल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. दोन वर्षानंतर कारखाना सुरु होत असून शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे प्रतिटन 2500 रुपये भाव दिला जाणार असून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंदणी करण्याचे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे.


संबंधित बातम्या :


Pandharpur News : माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरे काचेचीच, आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील : अभिजीत पाटील


osmanabad : धाराशिव साखर कारखान्यावरील आयकरची कारवाई संपली; राजकीय विरोधकांचं षडयंत्र, अभिजीत पाटील यांचा आरोप