Pandharpur News : "माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरे काचेचीच आहेत. मी आता दोन्ही हातांनी दगड मारेन. आयकर विभागाच्या छाप्यात काहीच गैर आढळलं नाही," अशी प्रतिक्रिया साखर उद्योजक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी दिली. चार दिवसाच्या आयकर विभागाच्या धाडीनंतर (IT Raids) आज (29 ऑगस्ट) साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपुरात (Pandharpur) एबीपी माझाशी बोलताना पहिल्यांदा दिलखुलास संवाद साधला. या चौकशीतून काहीच साध्य झालं नसल्याचा खुलासा अभिजीत पाटील यांनी केला. 


अभिजीत पाटील आणि प्रवीण दरेकरांच्या भेटीने भुवया उंचावल्या
गेले चार दिवस अभिजीत पाटील यांचे पंढरपूरचे कार्यालय, घर आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या उस्मानाबाद, लोहा-नांदेड, चांदवड-नाशिक, सांगोला इथल्या चार कारखान्यावर एकाच दिवशी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. याशिवाय त्यांचे संचालक असणाऱ्या एकावर कोल्हापूर जिल्हातील अर्जुनवाड इथेही या धाडी झाल्या होत्या. त्यांना काल (28 ऑगस्ट) रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखली इथल्या कारखान्यावर नेण्यात आले होतं. अभिजीत पाटील आज सकाळी पंढरपूरमध्ये आले आणि येताच विधानपरिषदेमधील भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रवीण दरेकर अध्यक्ष असणाऱ्या मुंबई डीसीसी बँकेने अभिजित पाटील यांच्या कारखान्यास 70 कोटीचे शॉर्ट लोन घेतले असल्याने त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. आज दरेकर यांनी अभिजीत पाटील यांच्या आयकर खात्याने धाडी टाकलेल्या कार्यालयात येऊन चहापानाचा आस्वाद घेतला.


जप्त केलेली रोकड परत केली : अभिजीत पाटील
यावेळी बोलताना पाटील यांनी आमच्या सर्व कारखाने आणि इतर व्यवसायात त्यांना 1 कोटी 12 लाखांची रोकड सापडली होती. मात्र ही सर्व रोकड रेकॉर्डवर असल्याने त्यांनी ती जप्त केलेली रक्कम देखील आम्हाला परत दिल्याचे सांगितलं. महिलांच्या स्त्री धनात असलेले 50 ते 60 तोळे सोनेही आयकर विभागाने हिशोब बघून परत दिल्याचे सांगताना व्यवहारात ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत त्याची कागदपत्रे येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सूचना आयकर विभागाने दिले असल्याचे त्यांनी सांगितलं. या चार दिवसात अभिजीत पाटील त्यांचे बंधू अमर पाटील, कारखान्याचे संचालक, सभासद आणि कर्मचारी अशा 100 लोकांची चौकशी आयकर विभागाने केल्याचा खुलासाही त्यांनी केला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या धाडी टाकायला लावल्याचे सांगताना त्यांचीही घरे काचेची आहेत त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असा इशारा दिला. 


Abhijeet Patil on IT Raid : आयकर छापे म्हणजे राजकीय षडयंत्र : अभिजीत पाटील



संबंधित बातमी


Abhijeet Patil : अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी