Abhijeet Patil : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर (Dharashiv Sugar Factory)  सुरु असलेली आयकर विभागाची (Income Tax Department) कारवाई संपली आहे. गुरुवारपासून आयकर विभागाकडून धाराशिव साखर कारखान्याचे तथा डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांचं कार्यालय आणि कारखान्यावर ही कारवाई सुरु होती. मात्र या कारवाईत आयकर विभागाला बेहिशेबी रोकड, सोने किंवा इतर मालमत्ता आढळली नाही अशी माहिती अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी दिली आहे. तसंच दिलेल्या माहितीमुळे आयकरचे समाधान झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. राजकीय विरोधकांनी हे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच त्यांनी आता पलटवाराला सामोर जावं असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


या  धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही. तसेच दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले. ज्या कागदपत्रांच्या त्रुटी आढळल्या त्याची पूर्तता येत्या 15 दिवसात करण्याच्या सूचना आयकर विभागाने दिल्या आहेत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.  एवढेच नाही तर या छाप्यात आयकर विभागाने जप्त केलेली 1 कोटी 12 लाखांची रोकड आणि 50 ते 60 तोळे सोनेही आयकर विभागाने परत दिल्याचा दावा त्यांनी केला आहे . विठ्ठल  कारखाना सुरु होऊ नये असे वाटणारे विरोधक या छाप्यामागे असल्याचा आरोप करताना त्यांचीही  घरे काचेची आहेत. त्यांनी एक दगड मारला आता मी देखील दोन हातांनी दगड मारायला मोकळा असल्याचा इशारा दिल्याने या आयकर छापेमारीनंतर पंढरपूरमधील राजकारण अजून पेटणार आहे . 


25 तारखेच्या सकाळी 7 वाजता डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी सबंधित साखर कारखाने, कार्यालय आणि निवासस्थानावर आयकर विभागाने धाडी टाकल्याने  एकच खळबळ उडाली. सलग चार दिवस चाललेल्या या धाडीत शंभरपेक्षा जास्त संबंधितांची तपासणी आयकर विभागाकडून करण्यात आली आहे. केवळ अभिजित पाटीलचं नव्हे तर सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीन पटेल, डॉ. गुरुनाथ परळे, डॉ. अनुपम शाह, डॉ. रघोजी यांच्याशी संबंधित कार्यालय आणि हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकला. सलग तीन ते चार दिवस आयकर विभागाने या सर्वांची कसून चौकशी केली. मात्र ही कारवाई राजकीय विरोधकांनी केलेल्या तक्रारीमुळे होती असा आरोप  डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केला आहे


आयकर विभागाने संपूर्ण चौकशी केली मात्र आपल्याकडे कोणतीच बेहिशोबी मालमत्ता आढळली नसल्याचे दावा देखील अभिजीत पाटील यांनी केला आहे. सोलापुरात प्रसिद्ध व्यावसायिक बिपिन पटेल सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्याशी मेहुल कन्स्ट्रक्शन, अश्विनी रुग्णालय, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय यांची देखील कसून तपासणी झाली. ज्या डॉ. गुरुनाथ परळे यांची चौकशी झाली त्यांनी देखील आपल्या चौकशीत केवळ आश्विनीचा उल्लेख झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  त्यामुळे याही कारवाईला राजकीय गंध असल्याचे बोलले जात आहे.


आयकर विभागाने सोलापूर, उस्मानाबादमध्ये जवळपास तीन ते चार दिवस तपासण्या केल्या. राजकीय गंधाने कारवाया झाल्या असं जरी आरोप असला तरी  तीन ते चार दिवस या कारवायांमधून आयकर विभागाच्या काय हाती लागलं? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.