मुंबई : शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या. त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली असून ही संख्या 18 हजारांवरुन 36 हजार थाळी इतकी झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज काढण्यात केला आहे. यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान 75 व कमाल 150 थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान 75 आणि कमाल 200 थाळी इतके वाढवता येईल.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने 1 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयान्वये केंद्राची निवड करण्याची पद्धत निश्चित करून दिली आहे. याचपद्धतीने पुढेही केंद्राची निवड करण्याची सूचना या शासन निर्णयान्वये देण्यात आली असून केंद्राची प्रतिदिन थाळीची संख्या आता आवश्यकतेनुसार 200 च्या मर्यादेत वाढवता येईल. सध्या 148 केंद्रावर 16 हजार 237 लोकांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा अस्वाद घेतल्याचे दिसून आले आहे.
केवळ 17 दिवसात राज्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
काय आहे शिवभोजन योजना?
राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरिब जनतेने उदंड प्रतिसाद दिला. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी 10 रुपयांत शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली. शिवभोजन योजनेतील भोजनालय ही दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असतात.
शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध
भोजनालय कोण सुरु करू शकतं?
शिव भोजनालय सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे. योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल. त्यासाठी महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.