पुणे : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. महाविकासआघाडी सरकारचा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवत पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित शिवभोजन थाळीचं अखेर उद्घाटन केलं आहे. ग्राहकांना आता केवळ दहा रुपयात संपूर्ण थाळीचा आस्वाद घेता येणार आहे, मात्र ग्राहकांना काही अटीतटींची पूर्तता करावी लागेल, तरंच या थाळीचा लाभ घेता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या बाहेरील निशिगंधा हॉटेलमध्ये थाळीचं उद्घाटन करण्यात आलं.


उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवभोजन ही कल्पना म्हणजे निवडणुकीपूर्वी दिलेलं एक आश्वासन होतं आणि त्याच आश्वासनाची आता आम्ही पूर्तता करत आहोत असं ते म्हणाले. आता फक्त दहा रुपयात संपूर्ण थाळी जेवण मिळणार म्हटलं तर ग्राहकांच्या रांगाच रांगा लागणार यात शंकाच नाही. मात्र गरीब होतकरु यांनी थाळीचा लाभ घ्यावा, ज्यांची ऐपत आहे त्यांनी या थाळीचा लाभ घेऊ नये असं पवार यांनी सूचवलं आहे. कारण ज्यांच्याकरिता ही योजना राबवण्यात येत आहे त्या गरजूंनी अगोदर याचा लाभ घेणं गरजेचं आहे. ही योजना नवीन असल्याने या योजनेत काही त्रुटी असतील असंही पवार म्हणाले.


विरोधकांबद्दल बोलत असताना विरोधक तर टीका करणारच असं ते म्हणाले. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मकरितीने पाहतोय पण विरोधक नकारात्मक बघतायत असं वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी आमदार चेतन तुपे, स्थायी समिती अध्यक्ष रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे असे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरात एकूण 122 ठिकाणी शिवभोजन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक, हिंगोली, धुळे, अहमदनगर, वाशिम, गडचिरोली, अकोला, वर्धा, बुलडाणा, गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर आणि मुंबई-ठाण्याचा समावेश आहे.


शिवभोजन थाळीत कोणत्या पदार्थांचा समावेश असेल?


शासनातर्फे सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येईल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी राहील. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल.


भोजनालय कोण सुरु करू शकतं?


शिव भोजनालय सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे. योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल. त्यासाठी महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.


स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेणार


योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल. ही समिती सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरविण्याची कार्यवाही करेल. तसेच सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास व सीएसआर आणि व्हीएसटीएफ इत्यादींच्या सहभागाबाबत निर्णय घेईल व शासनाच्या सहभागाबद्दल रुपरेषा ठरवेल. त्याचप्रमाणे, ही योजना शाश्वत व टिकणारी होण्यासाठी समिती क्रॉस सबसिडी व सार्वजनिक- खाजगी भागीदारी चे तत्व वापरण्यावर भर देईल.