नागपूर : बोलीभाषेत आपण शेंगदाण्याला गरीबांचा सुकामेवा म्हणतो. मात्र, नागपुरात काही भेसळखोरांनी खरंच शेंगदाण्याला पिस्ता बनवून दाखवलं आहे. शेंगदाण्याला रंगवून, सुकवून पिस्ता बनवण्याचा हा प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा घालून उघडकीस आणला आहे. शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याची कात्रण ( चिप्स ) करून ती मिठायांमध्ये वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घातलेल्या इमारतीतून तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे.
नागपुरात काही भेसळखोरांनी 90 रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पंधराशे रु किलोच्या पिस्ता सारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला आहे. नागपूरच्या बाबा रामसुमेर नगर परिसरातील एका इमारतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जेव्हा पोहोचले. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याला घातक हिरव्या रंगात रंगवून पिस्ता सारखे बनवण्याचे प्रकार उघडकीस आले.
शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून, चाळणीने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जाते. नंतर मशीनने त्याची कात्रण (चिप्स) करून 90 रु किलोच्या शेंगदाण्याची कात्रण बाजारात पंधराशे ते सतराशे रुपये किलोने पिस्ता किंवा बदामाची कात्रण म्हणून मिठाई उत्पादकांना विकली जाते.
सोनपापडी, पेढा, बर्फी, लाडू सारख्या अनेक मिठायांवर पिस्ता किंवा बदाम या महागड्या सुकामेव्याची कात्रण, चिप्स सजावट तसेच चवीसाठी लावली जाते. मात्र, सुकामेवाचे दर बरेच जास्त असल्याने काही भेसळखोरांनी शेंगदाण्यातून पिस्ता आणि बदामसारख्या महागड्या सुकामेव्याच्या कात्रण तयार करणे सुरु केले. त्यांचे हे उद्योग अनेक महिने राजरोसपणे सुरु होते. मात्र, काही दक्ष नागरिकांनी त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आणि सर्व प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांप्रमाणे ही शुद्ध भेसळ असून ग्राहकांची फसवणूक ही आहे. शिवाय शेंगदाण्याला रंगवण्यासाठी वापरला जाणारा हिरवा किंवा लाल रंग ही मिठाईमध्ये खाणाऱ्याच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे.
एबीपी माझाने या संदर्भात काही मिठाई वाल्यांशी बोलणे केले. ते कॅमेऱ्यावर बोलायला तयार झाले नाहीत. मात्र, सुकामेव्याचे दर बरेच जास्त असल्याने अनेक मिठाई दुकानदार पिस्ता किंवा बदामऐवजी शेंगदाण्याची कात्रण वापरत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. शेंगदाण्याची कात्रण असलेली मिठाई जास्त दिवस टिकत नाही, त्यास लवकरच बुरशीची लागण होते असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha