MP Sambhaji Raje Chattrapati Latter to CM : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं पत्र खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोनच दिवसांपूर्वी या उपोषणाची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. आज पत्र लिहीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली आहे. 8 महिन्यांपूर्वी सरकारनं दिलेलं आश्वासन हवेत विरल्याची संभाजीराजेंनी या पत्रातून तक्रारही केली आहे. त्यामुळेच उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. .


संभाजीराजे छत्रपतींनी यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय की, "5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही." आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे." 



मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण : संभाजीराजे छत्रपती 


2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. 


मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या.  आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण