जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावत लॉकडाऊन केले आहे. मात्र सरकारच्या या निर्बंधाला न जुमानता बाहेरून दुकान बंद ठेऊन आत मात्र मालाची विक्री करणाऱ्या कपड्याच्या दुकानावर रावेर नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली आहे. या दुकानदारावर तब्बल एक लाख 43 हजारांचा दंड वसूल करत हे दुकान सिल केले आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर शहरातील रूपम शॉपिंग असं या दुकानाचं नाव असून या कारवाईने संपूर्ण रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 


जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच कोरोनाबाबत हॉटस्पॉट राहिला आहे. आता पर्यंत 1 लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून दोन हजाराहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. कोरोनाचे दुसऱ्या लाटेत झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरले होते. एकीकडे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचारासाठी लागणारे इंजेक्शन,ऑक्सिजन आणि डॉक्टरची कमी मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने, कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहिला नव्हता. म्हणूनच सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारच्या दुकानांना बंदी घातली आहे. कोरोनामुळे अनेकांचे प्राण जात असताना सरकारच्या या धोरणाला सर्वांनी साथ देने गरजेचे आहे.  मात्र काही व्यापाऱ्यांचा सरकारच्या या निर्बंधांना विरोध आहे. त्यामुळे अनेकांनी चोरून लपून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. 


अशाच घटनेत रावेर शहरातील रुपम मॉल हे बाहेरून शटर बंद करून दुसऱ्या मार्गाने मात्र सुरूच ठेवत असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर आज दुपारच्या सुमारास नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तहसीलदार उषा राणी देवगुने यांच्या नेतृत्वात नगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांनी एकाच वेळी रुपम मॉल या कपड्याच्या भव्य दुकानात छापा मारला असता तब्बल दीडशे हून अधिक जन या दुकानात कपडे खरेदी करत असल्याचं आढळून आले होते.


यावेळी कोरोनाच्या नियंत्रणासाठी घालून दिलेले नियम पूर्णपणे धाब्यावर बसवत अनेकजण विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता फिरत असल्याचं आढळून आले. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत दुकानातील प्रत्येक व्यक्तीचा एक हजार रुपयांचा दंड आकारून एकाच वेळेस या दुकानातून एक लाख 43 हजार रुपयांचा दंड आकारणी केली. शिवाय रुपम मॉलला सिल केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने रावेर तालुक्यात करण्यात आलेल्या या कारवाईने सर्व व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 


इतर बातम्या