मुंबई : संपूर्ण देशात लसीचा तुटवडा जाणवत असताना प्रत्येक राज्य लस मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या अशा काळात प्रत्येक लसीचा डोस हा महत्त्वाचा आहे. या अशा परिस्थितीत केरळ राज्याने मात्र सगळ्यांसाठीच एक आदर्श घालून दिला आहे. त्यांना लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून डोस मिळाले 73 लाख 38 हजार 806 डोस, मात्र त्यांनी त्यातून 74 लाख 26 हजार 164 नागरिकांचे लसीकरण केले. याचा अर्थ  म्हणजे त्यांनी, तब्बल  87 हजार 358 अतिरिक्त नागरिकांना डोस दिले. 


प्रत्येक वायल मध्ये 10 डोस असतात, मात्र त्या व्यतिरिक्त त्यात एखादा डोस जास्त असतो, ज्याचा लस सिरिंजमध्ये भरताना अपव्यय होऊ शकतो. मात्र केरळ येथील नर्सिंग स्टाफ यांनी सूक्ष्म नियोजन आणि बारकाईने काम करून ते काही डोस वाचाविले आणि नागरिकांना दिले. केरळच्या मुख्यमंत्र्यानी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.


 






काही राज्यात म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यात लसीकरण मोहीम राबविताना लसीच्या अपव्यय होत असल्याचे खुद्द राज्याचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली त्यावेळी अधोरेखित केले होते. सध्या सर्वच राज्यात लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. लसीचा अपव्यय टाळणे ही खरी तर काळाची गरज आहे. महाराष्ट्रात राज्य सरकार लस मिळविण्याकरिता सगळे प्रयत्न करीत आहे. त्यांची केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील विविध कंपन्यांशी बोलणी सुरु आहे. दररोज होणाऱ्या लाखो नागरिकांच्या लसीकरण मोहिमेस राज्यात लसीच्या तुटवड्याअभावी खीळ बसली आहे. लस सुरक्षित आहे, ती सर्वानीच घेतली पाहिजे. लस घेतल्याने या आजारापासून संरक्षण प्राप्त होते. लसीचे दोन डोस घेतलेल्याना जरी कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सौम्य लक्षणांचा असतो. त्या रुग्णांना फारसा त्रास होत नाही असं वैद्यकीय तज्ञांनी अनेक वेळा सांगितले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणवर गर्दी करत आहेत. मात्र काही लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याचे बहुतांश राज्यात दिसत आहे. 


केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी ट्विटरद्वारे लसीकरणाच्या मोहिमेत नर्सिंग स्टाफ चांगले काम करत असल्याची माहिती देऊन आरोग्य कर्मचाऱ्याचे आणि नर्सिंग स्टाफचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यात राज्यात ज्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला त्यापेक्षा अधिक प्रमाणात नागरिकांना लस दिल्याचे सांगितले आहे. 


या प्रकरणी राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, "ही खूप चांगली बाब आहे. प्रत्येक राज्याने केरळच्या लसीकरण पॅटर्नची दखल घेतली पाहिजे. सध्याच्या काळात लसीचा एक-एक डोस महत्त्वाचा आहे. प्रत्येक वायलमध्ये एक बफर डोस असतो. सिरिंजमध्ये लस भरताना तो वाया जाऊ शकतो. मात्र त्याचे अचूक नियोजन केल्यास तो वाचू शकतो हे केरळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, नर्सिंग स्टाफने दाखवून दिले असेल तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही."


महत्वाच्या बातम्या: