नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. देशाची अर्थव्यवस्था नुकतीच रुळावर येत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेसमोर संकट उभं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 


शक्तिकांत दास म्हणाले की, "कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांवर रिझर्व्ह बँक नजर ठेऊन आहे. या काळात नागरिक, व्यापारी संस्था आणि दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या घटकांच्या मदतीसाठी रिझर्व्ह बँक नियोजन करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरून अर्थव्यवस्था आता कुठे रुळावर येत होती. परंतु देशात आता आलेल्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा त्या समोर मोठं संकट उभं राहिलंय. आपल्याला या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे."


आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचा निधी जाहीर
आरबीआयने आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचं घोषित केलं आहे. तसेच प्राथमिक क्षेत्रासाठी लवकरच कर्ज आणि इंसेन्टिव्हची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कर्जांना कोविड कर्जाचे स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसात आरबीआय 35 हजार कोटी रुपयांची सरकारी सिक्युरिटिज खरेदी करणार आहे. त्याची सुरुवात 20 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. 


शक्तिकांत दास म्हणाले की, "जागतिक अर्थव्यवस्थेत सुधार होण्याचे संकेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. भारत या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेल असा विश्वास आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चांगली रहाण्यासाठी असेल तर चांगल्या मान्सुनची अपेक्षा आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र मंदीतून बाहेर पडत आहे. कोरोना काळात अनेक व्यवसायांनी तग धरून रहायची कला अवगत केली आहे." 


 






देशातील कोरोनाची स्थिती
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 382,315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात यापूर्वी एक मे रोजी 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


महत्वाच्या बातम्या: