Majha Maha Katta: मुख्यमंत्री नसतो तर आर्मीमध्ये असतो, एकनाथ शिंदेंनी सांगितली ट्रेनिंग सोडून हरियाणाला लग्नाला गेल्याची कहाणी
Majha Mahakatta CM Eknath Shinde : मित्राच्या बहिणीचं लग्न करुन लखनऊला गेल्यानंतर तिथून आपल्याला परत पाठवल्याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
Majha Katta: मुख्यमंत्री म्हणून जर राजकारणात नसतो तर आर्मीत असतो, सैनिक म्हणून देशाची सेवा करत असतो असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आर्मीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगला जाताना वाट बदलून मित्राच्या लग्नाला हरियाणाला गेलो आणि नंतर आर्मीमध्ये घेतलं नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पिता-पुत्र आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही आठवण सांगितली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं. लखनऊला त्यासाठी ट्रेनिंगला जायचं होतं. माझा एक मित्र होता हरी परमार नावाचा. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने मला आमंत्रण दिलं होतं आणि त्याला आपण येणार असल्याचं सांगितलं होतं. मग लखनऊला जाताना अचानक ते आठवलं आणि आपण ट्रेन बदलली. दिल्लीला जाऊन तिथून हरियानातील रोहतकला लग्नाला गेलो.
Eknath Shinde On Army Bharati : आर्मीतून परत पाठवलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लग्न झाल्यानंतर दोन-चार दिवसानंतर मी लखनऊमधील ट्रेनिंग सेंटरला गेलो. पण आर्मीवाल्यांनी आपल्याला घेतलं नाही. पुन्हा नवीन वॉरंट आणण्यासाठी पाठवलं. मग परत इकडे आलो. तर त्यावेळी आपल्याकडे दंगल सुरू होती. आर्मीमध्ये सैनिक झालो नाही तरीही शिवसैनिक मात्र झालो.
श्रीकांत डॉक्टर झाला ते त्याच्या आईमुळेच
श्रीकांत डॉक्टर झाला ते त्याच्या आईमुळेच असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, श्रीकांतची ओळख ही सुरुवातीला एकनाथ शिंदेंचा मुलगा अशी होती, पण पाच वर्षाच्या कामानंतर त्याने स्वतःची ओळख निर्माण केली, त्यामुळे दुसऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला जास्त काही करावं लागलं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्या काळात त्याच्या आईने मेहनत घेतली होती.
... तर शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या वाटेला आले नसते
वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिंदेसाहेब राजकारणात असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, वडील कामात प्रचंड व्यस्त असल्याने ते आमच्या वाट्याला कमी आले. त्यावेळी मला आईचं पाठबळ मिळालं. जेव्हा मी राजकारणात आलो, त्यावेळी आपल्याला समजलं की राजकारण हे सोपं नसतं, त्यामध्ये किती अडचणी असतात. तेव्हा माझ्या वाटेला ते यावेत अशी मी अपेक्षा केली असतो तर आज महाराष्ट्राच्या वाटेला ते आले नसते.
काळजी जास्त कधी वाटली
एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला गेले त्यावेळी आमच्या कुटुंबातील सर्वांनाच काळजी वाटत होती असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
आपण आमदारांना घेऊन गुवाहाटीला जातोय ही गोष्ट श्रीकांतलाही माहिती नव्हती असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यावेळी आम्ही तिकडे असताना श्रीकांतने इकडे योग्य नियोजन केल्याचं ते म्हणाले. कुटुंब काळजीत असलं तरी मला मात्र त्याची काहीच काळजी नव्हती, जे काही होईल त्याची जबाबदारी माझी एकट्याची असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.