नाशिक : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा साधेपणा आजच्या नाशिकच्या दौऱ्यात बघायला मिळाला. 'एबीपी माझा'ने खरशेतमधील महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी कसरत दाखवताच आज दुपारी 1 वाजता खरशेत गावी पोहोचत लोखंडी पुलाची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली. त्यानंतर जवळीलच शेंद्रेपाडा येथील आदिवासी पाड्याला त्यांनी भेट देत त्या ठिकाणच्या पेयजल योजनेचे उद्घाटन करत गावच्या महिलांना हांड्याने पाणी भरून दिले. विशेष म्हणजे या गावात आयोजित कार्यक्रमात मंचावरील खुर्च्यांवर न बसता आदिवासी बांधवांसोबत खाली जमिनीवर बसत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाषणात बोलतांना त्यांनी 'एबीपी माझा'सह माध्यमांचे आभार मानले आणि गावकऱ्यांची त्यांनी माफीही मागितली.


या ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. शहरीकरण वाढत असताना राज्यातील अजूनही काही भाग असा आहे की जिथं साध्या सुविधाही पोहचल्या नाहीत. मी एबीपी माझावर ही बातमी बघून शिवसैनिकांना सांगितलं आणि या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यात आला. पुढच्या तीन महिन्यात 13 पाड्यांवर घरोघरी पाणी देणार."


आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "तुम्ही अनवाणी चालत असता. इथल्या रस्त्यांवर दगड-गोटे असतात. मीडियाने आशा व्यथा आमच्याकडे पोहोचवाव्यात. पर्यावरण मंत्री म्हणून काम करताना मला अभिमान वाटतो, या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात."


आरे जंगलातील आदिवासी पाडे मुख्यमंत्री साहेबांनी वाचवले. या ठिकाणी मी मार्गदर्शन नाही करायला आलो तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 


एबीपी माझा इम्पॅक्ट
नाशिकमधील त्र्यंबकेश्वकच्या खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ शिवसैनिकांना तास नदीवर लोखंडी पूल बसवण्याचे दिले होते आदेश दिले होते. त्यानंतर आता नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महिलांचे हाल थांबणार आहेत.  


संबंधित बातम्या :