बीड : राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानतंर राज्यभरात औषधांचा पुरवठा करणाऱ्या त्या 5 कंपन्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. बीड (Beed) जिल्ह्याच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापना करण्यात आली असन राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा (Medicine) पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या 5 कंपन्यांची नावेही समोर आली असून त्यांची चौकशी होणार आहे. 


राज्यात शासकीय संस्थांमध्ये अप्रमणित औषधे येत असल्याची बाब जानेवारी 2024 पासूनच समोर यायला सुरुवात झाली होती. हे सत्र सुरू झाल्यानंतर औषध विभागाला जाग आली. त्यानंतर याप्रकरणी पडताळणीची मोहीम सुरू करण्यात आली. या पडताळणीतून अस्तित्वात नसलेल्या 5 बोगस कंपन्यांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आली आहे. या औषधांवर उत्पादक म्हणून केरळ, उत्तराखंड, आंध्र प्रदेशच्या कंपन्यांची नावे होती. औषध विभागाने त्या त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांकडून माहिती मागवल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले होते.


या पाच कंपन्या बनावट, चौकशी होणार


१) म्रिस्टल फॉम्र्युलेशन, उत्तराखंड
२) रिफंट फार्मा, केरळ 
३) कॉम्युलेशन, आंध्र प्रदेश
४) मेलवॉन बायोसायन्सेस, केरळ
५) एसएमएन लॅब, उत्तराखंड


दरम्यान, या कंपनीकडून राज्यातील ज्या ज्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा पुरवठा झाला, त्या सगळ्या रुग्णालयातील औषधांसंदर्भात आता चौकशी होणार आहे.


सुषमा अंधारेंकडून तानाजी सावंतांवर गंभीर आरोप 


राज्यातील बोगस औषध कंपन्यांकडून औषध पुरवठ्याची घटना उजेडात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तत्कालिन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्या या गुजरातच्या आहेत. अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून गोळ्यांची खरेदी कशी केली? आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याकडून हापकिन्सकडून औषधांचा पुरवठा थांबवण्यात आला आणि एक नवीन प्राधिकरण तयार करण्यात आले. तानाजी सावंत यांनी ठरवून एक समांतर यंत्रणा उभी केल्याचं अंधारे यांनी म्हटलं. तसेच, तानाजी सावंत आणि धर्मरावबाबा अत्राम यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. 


हेही वाचा


जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ