जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin Yojana) राज्यात सुपरहीट ठरली. राज्यातील जवळपास अडीच लाख महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज दाखल करत योजनेचा लाभ घेतला. यातील बहुतांश महिलांना 1 ते 5 असे 5 हफ्त्यांचे एकूण 7500 रुपयेही थेट बँकेत जमा झाले. दरम्यान, या योजनेची चलती पाहून काहींनी बोगस कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये, काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण बनून योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता, जालन्यातील (Jalana) एका लाडक्या भावाने बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊन कमावलेला 7500 रुपये परत केले आहेत. त्यामुळे, या योजनेच्या माध्यमातून बनावटगिरी केलेल्यांना त्याची परतफेड करावी लागणार हे दिसून येते.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बनावटगिरीने मिळालेले साडे सात हजार रुपये लाडक्या भावाने आज प्रशासनाला परत केले आहे. जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेल्या विलास भुतेकर यांच्या पत्नीकडून लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरताना नजरचुकीने विलास भुतेकर यांचं आधार कार्ड अपलोड झाले होते. दरम्यान 5 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र, आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले आहे. त्यामुळे, भुतेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत व चुकीच्या पद्धतीने मिळालेले शासनाचे 7 हजार 500 रुपये शासनाला परत केले आहेत.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं असून लाडकी बहीण योजना आमच्यासाठी गेमचेंजर ठरली असल्याचं महायुतीचे प्रमुख नेते जाहीरपणे सांगत आहेत. महायुतीला राज्यात तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून 132 जागांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची आता तपासणी होणार असून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे जमा करत, खोटी व बनावट कागदपत्रे जमा करत ज्यांनी पैसे लाटले त्यांचे अर्ज बाद केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, लाडक्या बहिणींना धास्ती लागली आहे. तर, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर अद्यापही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता न जमा झाल्याने, पुढील हफ्ता कधी जमा होणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.
हेही वाचा
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद