Satish Wagh Murder Case Update पुणे : पुण्यातील विधानपरिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली असून यात पुणे पोलिसांनी अपहरण करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आलं असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरु आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाचे चक्र आता अधिक गातीमान करत पुढील कारवाई सुरू केली असून या संशयितांकडून कुठली नवी माहिती पुढे येते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक, तपासाला वेग
शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील गुन्हेगारी सध्या चव्हाट्यावर आलेला विषय बनला आहे. पुण्यातील हडपसर येथे चक्क आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादवा वाघ (वय 55 वर्षे) यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. सतीश वाघ (Satish Wagh) यांचे सोमवारी (दि. 9) सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी मृतदेह आढळला. सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या एका चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं.
अपहरण केल्यानंतर काही तासांमध्येच सतीश वाघ यांचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेमक्या कोणत्या कारणातून त्यांचा जीव घेण्यात आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या घटनेला 24 तास उलटून देखील अद्याप अपहरणकर्त्यांचा नेमका शोध लागला नाही. पोलिसांची वेगवेगळी पथकं तपास केल्यानंतर या प्रकरणी आता दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
शेतजमिनीच्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास
सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा