Aaditya Thackeray: पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं?
Aaditya Thackeray: "उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या काही मर्यादा आहेत, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला हवे, ते पुरेसा वेळ देत नाहीत," अशी तक्रार खासदारांनी केली होती.

Aaditya Thackeray: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अंतर्गत धुसफूस आणि नाराजीच समोर आल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रियंका चतुर्वेदी यांची संजय राऊतांविरोधात नाराजी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कमालीची शांतता चर्चेचा विषय ठरत आहे.
खासदारांची तक्रार आणि आदित्य ठाकरेंची कोंडी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीपूर्वी संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत काही खासदारांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. "उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या काही मर्यादा आहेत, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला हवे, ते पुरेसा वेळ देत नाहीत," अशी तक्रार खासदारांनी केली होती. या तक्रारीचा पडसाद खासदारांच्या मुख्य बैठकीतही उमटले.
प्रियंका चतुर्वेदींचा 'प्रोटेस्ट' अन् आदित्य ठाकरेंचे मौन
बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून आणि संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावरून प्रियंका चतुर्वेदी प्रचंड आक्रमक झाल्या. "I want to protest. संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव का घेतले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उद्धव ठाकरेंनी राऊतांची बाजू सावरली. दुसरीकडे, बैठकीत उपस्थित असूनही आदित्य ठाकरे यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नाही. त्यांच्या देहबोलीतून ते नाराज असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते, असे बैठकीतील सूत्रांचे म्हणणे आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जावे, अशी मागणी खासदारांनी केल्याने त्यांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बैठकीनंतरही आदित्य ठाकरे कोणाशीही न बोलता निघून गेल्याने खासदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
खासदारांच्या बैठकीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप, राष्ट्रवादीचे लोक सांगतात. तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यसभेच्या जागेसाठी मल्लिकार्जुन खरगे, के. सी वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी अचानक प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.























