Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका युवकाने गर्भवती असल्याचा बनाव केला आहे. गर्भवती असल्याचे प्रत्येक महिन्याचे व प्रसूत झाल्याचे फोटो समाज माध्यमात व्हायरल केले आहेत. दरम्यान, अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी युवकावर डोनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित सुधीर सदार असं या युवकाचं नाव आहे.
नेमका प्रकार काय?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील 22 वर्षीय सुमित सुधीर सदार या युवकाने दरबार भरवणे सुरू केलं होतं. काही दिवसानंतर सुमित सदार याने आपल्या भक्तांना आपण गर्भवती असल्याचं सांगितलं. त्यानंतर सोशल मीडियावर तशा पोस्ट देखील केल्या होत्या. इतकच नाही तर सुमित सदार याने प्रत्येक महिन्याचा गर्भवती असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. एक ते नऊ महिन्यापर्यंतचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियात व्हायरल केला होता. त्यानंतर सुमित हजार याने आपण प्रसूत झालो असून फोटो बाळासह समाज माध्यमात टाकला होता.
पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार आला समोर
दरम्यान, या घटनेची दखल घेत डोणगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. सुमित सदारला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हे बाळ भुसावळ येथून एका भिक्षेकरी महिलेच्या संमतीने आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमित सदार याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) , 93 , 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुमित सदार याने नऊ महिन्यात आपण वेगवेगळ्या स्त्री रोग आणि प्रस्तुती तज्ञ डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केल्याचाही दावा केला होता. दरम्यान, पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांनी कठोर गुन्हा दाखल करुन युवकास कडक शिक्षा द्यावी
याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सदर प्रकार हा निंदनीय असून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. पोलिसांनी अतिशय सौम्य अशा कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेता कठोरात कठोर गुन्हे दाखल करून सदर युवकास कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी अन्द्धश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शैलेश सावजी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: