नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातही पाण्याच्या अभावामुळे पुरेशा पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात येवून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी अशी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे.
नाशिक जिल्हृयात कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम थेट शेतीवर देखील झाला आहे. अनेक पिकांचे उत्पादन घटल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात सुहास कांदे, दिलीप बोरसे, मंत्री डॉ. भारती पवार आदींनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. आता थेट पालकमंत्री दादा भुसे यांनीच ही मागणी लावून धरली आहे.
दुष्काळ जाहीर करा
नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून पालकमंत्री दादा भुसे यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली आहे. तसेच याबाबत गांभीर्याने विचार करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.
दुष्काळी भागात केंद्रीय पथकाची पाहणी
नाशिक जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतीची बिकट परिस्थिती पहायला मिळत आहे. अपुऱ्या पावसात जीवाचं रान करून शेती पिकवली, मात्र उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती पाहणी केली. नाशिकच्या काही भागांमध्ये दौरा करत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. उपस्थित अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्राला तसा अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले.