पुणे : पुण्यात अपघातांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकांचा जीव जात आहेत. यावर आता उपाययोजना तयार करण्याची (Pune Accident)  गरज आहे. त्यासाठी आता मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. अपघातांचा शास्त्रीय अभ्यास, रस्ते अभियांत्रिकी, वाहतूकीचे अभ्यासपूर्ण नियोजन, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासोबत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई या विविध उपाययोजनांद्वारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


डॉ.देशमुख म्हणाले, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करणे महत्वाचे असून ती काळाजी गरज आहे. शहरीकरण, उत्तम रस्ते, अत्याधुनिक वाहनांची उपलब्धता अशा वातावरणात अपघातांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. प्रभावशाली उपाययोजना करून अपघात थांबविण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनासोबत अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण गरजेचे आहे. अपघातांची कारणे लक्षात घेऊन विविध यंत्रणांनी त्याचे एकत्रितपणे विश्लेषण केल्यास चांगले उपाय शोधता येतील. कार्यशाळेच्या माध्यमातून याबाबत चांगल्या सूचना याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


पुण्यातील औद्योगिकरण आणि लोकसंख्या वाढत असतांना राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील अपघातातील जीवितहानी अधिक आहे. शहरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना निश्चित कराव्या लागतील. लहान मुलांना अपघातापासून वाचविण्यासाठी कार्यशाळेत विचारमंथन व्हावे, असेही डॉ.देशमुख म्हणाले. पुणे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला युनेस्कोच्यावतीने सादरीकरणाद्वारे अपघातांची कारणे आणि सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.


महानगरपालिका, पोलीस, पीएमपीएमएल, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एसटी महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, ससून हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी यांनासोबत घेत अपघातावर नियोजन कऱण्यात येणार आहे .


 अपघाताचे 63 ब्लॅक स्पॉट...


भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने कळविलेले जिल्ह्यातील 63 ब्लॅक स्पॉट तसेच स्थानिक यंत्रणांनी निश्चित केलेली वारंवार अपघात होणारी ठिकाणे येथे अपघात झाल्यानंतर प्रतिसाद प्रणाली कशा पद्धतीने कार्यरत आहे यासंबंधी माहितीचे विश्लेषण करावे. त्यानुसार  महत्वाच्या क्षणी (गोल्डन अवरमध्ये) रुग्णांना उपचार मिळावा यादृष्टीने रुग्णवाहिका तेथे गतीने उपलब्ध करता येईल, अशी व्यवस्था करावी. परिसरातील सर्व ट्रॉमा केअर सेवा उपलब्ध असलेल्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांची माहिती सर्व संबंधित विभागांना उपलब्ध करुन द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-


Dhanteras : दिवाळी दागिने खरेदी करण्यापेक्षा सोने खरेदीच्या 'या' पर्यायांमध्ये गुंतवणूक करा