विलगीकरण कक्षातील शौचालयाची 8 वर्षीय चिमुकल्याकडून साफसफाई! बुलडाण्यातील संतापजनक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील मारोड गावातील शाळेच्या विलगीकरण कक्षाची व शौचालयाची साफसफाई प्रशासनाने एका 8 वर्षीय शालेय बालकाकडून करून घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. सर्वप्रथम एबीपी माझाने या घृणास्पद प्रकाराची बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जाग झालं.
बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गाव पातळीवर शाळा खोल्यात विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 11 कोरोनाबधितांना ठेवण्यात आलं होतं. 29 मे रोजी जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ते या शाळेच्या भेटीला येतील म्हणून गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी सर्व शाळा साफसफाई करून घेण्याचे तातडीचे आदेश सरपंच व शिक्षकांना दिले होते. त्यानुसार मारोड या गावातील या शाळेच्या विलगीकरण कक्षाची व शौचालयाची साफसफाई प्रशासनाने एका 8 वर्षीय शालेय बालकाकडून करून घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. सर्वप्रथम एबीपी माझाने या घृणास्पद प्रकाराची बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जाग झालं.
या प्रकाराबाबत मला माहिती नाही- संजय पाटील , बीडीओ संग्रामपूर
घडलेल्या घटनेच्या बाबतीत व व्हायरल व्हिडीओ बाबत संग्रामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय पाटील यांना एबीपी माझाने विचारणा केली असता, "मला या प्रकाराबद्दल अधिकृत काहीही माहिती नाही आणि आज रविवार असल्याने तुम्ही बातमी लावून कशाला आमची सुटी खराब करता" असं बेजबाबदार उत्तर देऊन त्यांनी प्रतिसाद देण्याचं टाळलं.
भाऊ भोजने यांची पोलिसात तक्रार
मारोड येथील अशोभनीय घटनेबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्यासह दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. या पीडित मुलाला न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी तामगाव पोलिसात बीडीओ व इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आज 2 जूनपर्यंतही तामगाव पोलिसांनी या पीडित बालकाचा जबाबही नोंदवला नाहीय. इतक्या गंभीर प्रकरणाची साधी दखल सुद्धा तामगाव पोलिसांना घेता आली नाही.
दरम्यान एबीपी माझाने हे प्रकरण लावून धरल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली आहे. संग्रामपूरच्या महिला उपविभागीय अधिकारी व इंसिडेंट कमांडर तेजश्री कोरे यांनी बीडीओ संजय पाटील यांना फोनवरुन संबंधित प्रकाराबद्दल विचारणा केली असता "वार्ताहर काहीही सांगेल तर तुम्ही ऐकता का...? " असं उद्धट उत्तर देऊन परिसरातील पत्रकारांचाही अवमान केला. शिवाय अनेक उद्धट भाषेत उत्तर दिले. या संभाषणाचा ऑडिओ सध्या बुलढाणा जिल्ह्यात खूप व्हायरल होत आहे.
एबीपी माझाच्या बातमी नंतर कारवाई, पण खरा दोषी अजूनही मोकाट?
एबीपी माझाने हे प्रकरण लावून धरल्याने जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी यांनी एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून तात्काळ मारोड यागावी चौकशीसाठी पाठविली. चौकशी समितीच्या मागावर एबीपी माझा थेट मारोड गावातही गेला. चौकशी समितीने मारोड येथील ग्रामसेवक यांना निलंबित केलं तर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी मारोड येथील मुख्याध्यापक व एका शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतु मुख्य दोषी गट विकास अधिकारी यांच्यावर चौकशी समितीचा अहवाल उद्या आल्यावर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
राज्य व केंद्रीय बाल हक्क आयोग अजूनही झोपेत?
मारोड येथील 8 वर्षीय बालकाकडून कोविड सेंटर व तेथील शौचालयाची साफसफाई हाताने करून घेतल्याप्रकरणी सर्व माध्यमात बातम्या येऊनही राज्य व केंद्रीय बालहक्क आयोगाने याची अजूनही दखल घेतली नसल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. अजून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याने या परिसरात प्रशासनाबद्दल तीव्र संताप आहे.