7th September Headlines : आज दिवसभरात विविध घडामोडी आहेत. मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह असणार आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय, जालन्यातील लाठीचार्ज विरोधात सांगली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी हे इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा इंडोनेशिया दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसियान-भारत शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जकार्ताला पोहोचले आहेत. मोदी आज संध्याकाळीच दिल्लीला रवाना होतील.
राहुल गांधी युरोप दौऱ्यावर
राहुल गांधी आठवडाभराच्या युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वकील, विद्यार्थी आणि युरोपियन युनियन (EU) मधील भारतीयांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी आज ब्रुसेल्समध्ये EU वकिलांच्या गटाला भेटतील आणि द हेगमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत.
ठाण्यात दहीहंडीचा उत्साह
वर्तक नगर: प्रो गोविंदाचं आयोजन केलं आहे. विश्व विक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये दिले जाणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते वरूण धवन, विकी कौशल, आयुष्यमान खुराणा यांच्यासह इतर सेलिब्रिटीची हजेरी लावणार आहेत.
ठाणे शहरात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे संध्याकाळी या ठिकाणी येणार आहेत. इथे 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखाच पारितोषिक दिलं जाणार आहे.
टेंबी नाका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
संकल्प प्रतिष्ठान, ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. अभिनेते सुनिल शेट्टी, चंकी पांडे तसेच इतर बॅालिवुड स्टार, अवधुत गुप्ते आणि मराठी सिने सृष्टीमधील कलाकार हजेरी लावणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहे.
मुंबईतही दहीहंडी उत्सवाचे आयोजन
दादर आयडीयल दहिहंडी - यंदा ही दहिहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी पर्यावरण विषषावरील पथनाट्य होतील. इथे महिला हंडी, दिव्यांगही दहीहंडी फोडणार आहेत.
वरळी जांबोरी मैदान - आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपच्यावतीने भ्रष्टाचाराची हंडी फोडली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जांबोरी मैदान येथे उपस्थित राहतील.
घाटकोपर दहीहंडी - भाजप आमदार राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयोगमंत्री उदय सामंत उपस्थित रहाणार आहेत. रोहित शेट्टी, विकी कौशल- कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र आदी सेलिब्रेटी हजर राहणार आहेत.
वरळी: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतील मंडळांची भेट घेणार आहेत.
दादर शिवसेना भवनासमोर युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडी - युवासेना कार्यकारिणीकडून दादरच्या शिवसेना भवनासमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून शक्तीप्रदर्शनाची तयारी त्यासोबतच एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा काम होणार आहे.
मनोज जरांगे आज उपोषण मागे घेणार?
जालना – मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या चार दिवसाच्या अल्टीमेटम मधले तीन दिवस उरले आहे. कुणबी दाखल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलीये. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत.
सांगलीमध्ये बंदचे आवाहन
सांगली – जालन्यामध्ये मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यासाठी आज सांगली जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.
नागपूर
- काँग्रेस नागपूर जिल्ह्यासाठीच्या जनसंवाद यात्रेत आज नाना पटोले सहभागी होणार आहे.