Todays Headline : आज कार्तिकी एकादशी, तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटीची महत्त्वाची बैठक, जाणून घ्या दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : आज राज्यभर कार्तिकी एकादशी साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश यांसारख्या विधींना सुरुवात होते. तसेच आज मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाच्या संचालकांची बैठक होणार असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळ संचालकांची बैठक
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता आणि चार हजार गाड्या घेण्यासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात होणारी नियोजित बैठक रद्द झाली होती. त्यानंतर या आठवड्यात बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या तर दोन हजार इलेक्ट्रिक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. यातील 700 डिझेल गाड्या नव्या रुपात त्वरीत एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरीची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना हाती अधिकचे पैसे पडतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खाते असल्यानं तेच महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला मुख्यमंत्री संप आणि कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी कोणती संजिवनी देतात हे पाहावं लागेल.
आज कार्तिकी एकादशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीसांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा
आज कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाच्या नित्यपूजा करण्यात आली. पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणीची पूजा पार पडली. आषाढी व कार्तिकी अशा दोन्ही पूजा करायचा मान मिळणारे फडणवीस हे राज्यातील पहिले दाम्पत्य ठरणार आहे. त्यानंतर विठ्ठल सभामंडपात उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर पहाटे वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली.
आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अधिवेशन
आजपासून शिर्डीत राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला शरद पवार आज उपस्थित राहणार नाहीत. शरद पवारांना बरं होण्यास आणखी एक-दोन दिवस लागणार असल्यानं ते या अधिवेशनाला उपस्थिती लावू शकणार नाहीत. या अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापुरात बैठक
कोल्हापूरमध्ये आज महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कर्नाटकचे राज्यपाल यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील सीमा भागातील अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये अलमट्टीच्या उंची वाढवण्याचा प्रश्न, त्याचबरोबर सीमा भागातील समस्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.
नाशिकमध्ये वॉटरग्रेस कंपनीविरोधातील याचिकेवर सुनावणी
नाशिकमधील वॉटरग्रेस कंपनीने 450 मुलांना कामावरुन काढलं आहे. आज त्या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. महापालिकेचा स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीने 450 मुलांना कामावरुन काढले आहे. याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मुलांना मारहाण केल्याप्रकरणी कंपनीचे मालक आणि साथीदाराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आज या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.