एक्स्प्लोर
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा
सकाळी ध्वजपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत शिवपालखीचे राजसदरेवर आगमन झालं.
रायगड : तिथीप्रमाणे साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा आज हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर संपन्न झाला. धुकं आणि पावसाच्या हजेरीत हजारो शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि कोकण कडा मित्र मंडळ यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 345 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला.
सकाळी ध्वजपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत शिवपालखीचे राजसदरेवर आगमन झालं. यावेळी शंखनाद, मंत्रोच्चार, अभिषेक आणि मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यावर सोन्याच्या नाण्यांचा मुद्राभिषेक घालून 'राज्याभिषेक' सोहळा संपन्न झाला.
मुख्य दरबारात असलेल्या शिवभक्तांनी 'जय शिवाजी जय शिवराय'चा नारा देत जयघोष केला. महिलांनी फुगड्या घालून, तर तरुणांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ताल धरला होता.
संपूर्ण गडावर शिवभक्तांनी भगवे झेंडे आणि फेटे घालून पारंपरिक वेशात सहभाग घेतला होता. तर, सकाळपासूनच किल्ले रायगडावर सुरु झालेल्या पावसाच्या सरींमुळे शिवभक्तांनी धुकं आणि पावसाच्या साक्षीने राज्याभिषेकाचा आनंद घेतला.
राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही राजसदरेवरून वाजतगाजत शिवसमाधीकडे नेण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर रोपवेने जाणाऱ्या शिवभक्तांना डोंगरातून वाहणारे धबधबे आणि धुक्याचं विहंगम असं दृश्य पाहायला मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
दरम्यान, पावसामुळे रायगडावरुन येणारा रस्ता बंद झाल्याने शिवभक्तांना अडचणीचा सामना करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement