Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात ओमायक्रॉनसह (Omicron) कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता राज्यातील 305 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोळुंखे यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत जे. जे. रुग्णालयासह राज्यातील विविध रूग्णालयांतील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती डॉ. सोळुंखे यांनी दिली.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 26.538 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होत आहे. राज्यातील जे. जे. रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम, ठाणे, धुळे, कुपर, पुण्यातील ससून रुग्णालय, मिरज, लातूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्याही रूग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात सध्या 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 259 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईत धोका वाढला
राज्यासह मुंबईतही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल मुंबईत 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकली असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या