यवतमाळ : महिला सक्षमीकरणाबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे.
सन 2015 साली स्थापन झालेल्या लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात साधारण 60 हजार लोकसंख्या आहे. या सर्वांसाठी लोहारा पोलीस ठाण्यात महिला आणि पुरुष मिळून साधारण 50 कर्मचारी कार्यरत होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही पुरुषांपेक्षाही जास्त चांगले काम करून दाखवू असा विश्वास महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
पोलीस स्टेशनमध्ये सर्वच ही जबाबदारी सांभाळणे आव्हानात्मक आहे मात्र या कामाचा आनंद आहे आणि आता आम्ही बिट मध्ये जाऊन तपास करू शकतो. तसेच यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल असं कार्य आम्ही करून दाखविणार असं महिला पोलिसांनी मत व्यक्त केलं.
सध्या यवतमाळ जिल्ह्यात 31 पोलीस स्टेशन आहेत त्यातील यवतमाळ चे लोहारा पोलीस स्टेशनचे कामकाज महिला सक्षमपणे सांभाळू शकतात असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलिप पाटील भुजबळ यांनी दाखविला आणि त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी लोहारा पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी आता एकदिलाने काम करीत आहोत असेही महिला कर्मचारी यांनी सांगितल आहे .
रात्री बेरात्रीसुध्दा रस्त्यावर पेट्रोलिंग असो किंवा तेवढ्याच आव्हानामक कार्य असो ते सर्व महिला कर्मचारी पाहतात. कौटुंबिक वादसुध्दा महिला कर्मचारी मिटवितात आणि कुठं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सुद्धा सक्षमपणे सांभाळू शकतो असे लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी सांगितले.
या लोहारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 10 किलोमीटरचा परिसर आहे. सध्या जुन्या केसेस समजावून घेणे, बिट समजावून घेणे अशी काम पुरुष मंडळीकडून महिला कर्मचारी समजावून घेत आहेत. आता पुरुषांसारखेच किंवा त्यांच्या पेक्षाही चांगले आणि दर्जेदार काम सक्षमपणे आणि कणखरपणे मिळून साऱ्या जणींनी लोहारा पोलीस स्टेशनचा कारभार पाहण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :