28th April Headlines: कृषी बाजार समितीची निवडणूक, मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण; आज दिवसभरात
28th April Headlines: राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काही जिल्ह्यात मंत्री, आमदार, बडे राजकीय नेते यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
28th April Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काही जिल्ह्यात मंत्री, आमदार, बडे राजकीय नेते यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. स्थानिक पातळीवर या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या आघाड्यादेखील चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तर, मॉरिशसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर 30 एप्रिलला उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकी अंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि उमेदवारांची संख्या 10 हजार 345 इतकी आहे. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 जागांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
रत्नागिरी
- कोकणातले रिफायनरी विरोधक प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आज राजापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विरोधातल्या या आंदोलनाचा आज महत्वाचा दिवस आहे. रिफायनरी विरोधक आज आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
मुंबई
- अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली हा आरोपी आहे. 3 जून 2013 रोजी जियानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यासाठी तिचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला जबाबदार धरत जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपात हा खटला चालवण्यात आला आहे.
- नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीकरण मुंबई महानगर पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे.
पुणे
- केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सुरक्षा यंत्रणेची पाहणी करण्यात येणार आहे.
सांगली
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम, उद्घाटन करणार आहेत.
नंदुरबार
- नंदुरबार येथील आकाशवाणीच्या एफएम केंद्राचे उद्घाटन देशाचे माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थित होत असून सातपुड्याच्या डोंगर भागात आता रेडिओची सेवा मिळणार आहे.
दिल्ली
- पालघर साधू हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र शिंदे सरकारने प्रतिज्ञापत्र देऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली होती.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज मॉरिशसमध्ये लोकार्पण. मॉरिशसचे पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम.
- दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू कोर्टात निर्णय येण्याची शक्यता आहे.