(Source: ECI/ABP News/ABP Majha)
26th June Headlines: मुसळधार पावसाची शक्यता, आजपासून दोन दिवस के चंद्रशेखरराव महाराष्ट्रात, आज दिवसभरात
26th June Headlines: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज रिंगण पार पडणार आहे. तर,संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूर येथून निघाल्यावर ठाकूरबुवाची समाधी येथे सकाळी तिसरे गोल रिंगण पार पडेल.
26th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आजपासून दोन दिवस के चंद्रशेखरराव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज रिंगण पार पडणार आहे. तर,संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूर येथून निघाल्यावर ठाकूरबुवाची समाधी येथे सकाळी तिसरे गोल रिंगण पार पडेल.
मुसळधार पावसाची शक्यता -
राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये. कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार तर उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिकात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया परिसरात काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजपासून दोन दिवस के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात
तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता हैद्राबादहून मंत्री, आमदार, खासदार अशा 300 गाड्यांचा ताफा घेऊन निघणार आहेत. उमगरगा येथे नाष्टा करून ताफा मुक्कामासाठी सोलापुरात येणार आहेत. हॉटेलच्या 300 रूम बुक केल्याची माहिती. 27 जून रोजी सकाळी 10 वाजता ताफा पंढरपूर मध्ये येऊन विठ्ठल दर्शन घेतील आणि वारकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी भगीरथ भालके यांच्या सरकोली येथील निवासस्थानी सगळे भोजन करतील. भागिरथ भालके यांचा प्रवेश होणार आहे. यानंतर चंद्रशेखरराव आणि सहकारी तुळजापूर येथे दर्शन घेऊन हैद्राबाद साठी निघतील.
सामाजिक न्याय दिवस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वस्तीगृहाचे उद्घाटन
मुंबई – आज सामाजिक न्याय दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील चेंबूर या ठिकाणी 1000 मुला मुलींचे सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत वस्तीगृह सुरू होत आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात मोठी घोषणा करू शकतात. सकाळी 10.30 वाजता चेंबूर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित हे उद्घाटन होणार आहे.
मुंबई – आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभाग कार्यालयावर अँड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.
पालखी सोहळा -
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूर येथून निघाल्यावर ठाकूरबुवाची समाधी येथे सकाळी तिसरे गोल रिंगण पार पडेल. त्यानंतर दुपारी वाडी कुरोली येथे संत सोपानदेव यांच्या पालखीची भेट होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम भंडीशेगाव येथे असेल. संत तुकाराम महाराज पालखी आज बोरगाव येथून निघाल्यावर दुपारी तोंडले बोंडले येथे धावा होईल. संध्याकाळी पिराची कुडोली येथे पालखी पोहोचल्यावर पालखीचा मुक्काम तेथेच होईल.
रनागिरी – शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण राणेंची तोफ धडाडणार आहे. जोडीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण हे नेते असणार उपस्थित. मोदी @9 निमित्त आयोजित कार्यक्रमात अंतर्गत दुपारी 3 वाजता होणाऱ्या सभेत हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. ही सभा म्हणजे लोकसभेची तयारी असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.
कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा सोहळा सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी जिल्ह्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहत असतात त्या ठिकाणाहून शहरांमध्ये भव्य रॅली निघेल.
सांगली – रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बोरगाव जवळील टोल नाका स्थानिक लोकांना माफ करावा या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता रत्नागिरी नागपूर महामार्गावर रास्ता रोको टोलनाक्याजवळचे स्थानिक नागरिक करणार आहेत. टोल नाक्या जवळील गावांमधील नागरिकांना शेतीच्या कामासाठी सातत्याने हायवेवरून जावं लागतं. त्यामुळे या नागरिकांना टोल माफीचे सर्टिफिकेट तात्काळ द्यावे अशी मागणी धरून या भागातील नागरिक आज रत्नागिरी नागपूर हायवे वर ही आंदोलन करणार आहेत.
नाशिक –
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करा अशी मागणी एकीकडे विधानसभा अध्यक्षकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यातच गेल्या पंधरा दिवसात दोन मॉब लिंचिंगचे प्रकार घडले असून यात दोघांची हत्या देखिल झाली आहे. संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नाशिक जिल्हा बँकेविराधात सक्तीची कर्जवसुलीसह विविध विषयांवरून शेतकरी नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्याकडून होम हवन करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला जाणार आहे.
अहमदनगर – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, मध्यप्रदेशचे पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष विनोद गोंटिया यांच्या उपस्थितीत भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभा संयुक्त मोर्चा संमेलन होणार आहे.
जळगाव – शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगावात येणार आहेत. कापसाला भाव द्या आणि जिह्यातील पाणी टंचाई सोडवा अन्यथा काळे झेंडे दाखविण्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
धुळे –
धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 7 वाजता संतोषी माता मंदिर चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे.
परभणी – जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास परभणी आणि सेलुतील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. कमी भावात शासन जमिनी घेत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय ज्यासाठी आज सेलुतील चिकलठाणा फाटा येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे.
नागपूर – अमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त नागपूर पोलीस आज गेल्या काही वर्षात जप्त करण्यात आलेले विविध अमली पदार्थ जाळून नष्ट करणार आहेत. नागपूरच्या वेशीवरील डंपिंग यार्ड परिसरात नियमानुसार अमली पदार्थ जाळून नष्ट करण्याची ही प्रक्रिया केली जाणार आहे. नागपूरसह महाराष्ट्र अमली पदार्थ मुक्त ठेवण्याच्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत हे केले जात आहे.
अमरावती – आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे. त्यानिमित्त सकाळी 7 वाजता अमरावती शहरातील इर्विन चौक ते राजकमल चौक रॅली काढली जाणार आहे. या रॅलीला पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी हिरवी झेंडी दाखवणार आहेत.
मुंबई – महाराष्ट्रातील युवा खेळाडूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खासदार राहुल शेवाळे, रणजीत सावरकर (अध्यक्ष,महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन) आणि क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांची पत्रकार परिषद होणार आहे, दुपारी 3 वाजता, मादाम कामा सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.
आजच्या सुनावणी.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उघडी गटारं आणि धोकादायक मॅनहोल्सचा बंदोबस्त कसा करणार? यावर पालिका प्रशासन स्पष्ट करणार आपली भूमिका. केवळ पाणी साचणाऱ्या भागांतील नव्हे तर सरसकट सर्वच्या सर्व मॅनहोल्सवर संरक्षक जाळी बसवणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं मत व्यक्त केलं आहे. मुंबईतील उघडी मॅनहोल्स आणि रस्त्यांवरील खड्डे याबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी. पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाल्यानंतर आजची सुनावणी महत्त्वाची.
ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. मुश्रीफांना याप्रकरणी हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपतंय ते कायम करून घेण्याचा मुश्रीफांचा प्रयत्न असेल.
नागपूर जमीन घोटाळ्यात ईडीनं अटक केलेल्या वकिल सतीश उके यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. उके यांनी तत्कालीन विरोधीपक्ष नेता आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते आरोप.