22nd August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शेतकरी आज राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. कांदा प्रश्नावर कृषी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत, तर आजपासून ठाकरे गटाच्या आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात होणार आहे.


कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं


राज्यभरातील विविध ठिकाणी आज केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आंदोलनं होणार आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून पुणे- नाशिक महामार्गावर आळे फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणाक आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अहमदनगर आणि राहुरी मध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.


कांदा प्रश्नावर कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट


केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लादला, केंद्राच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत मुंडे आज चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती तरी काही तोडगा निघणार का? की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद कायम राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


आजपासून ठाकरे गटाच्या आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात


ठाकरे गटाकडून 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्टदरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसनेचे 18 खासदार विजयी झाले होते, त्यामुळे पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची असणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा देखील आढावा ठाकरे गटाकडून 25 तारखेला घेतला जाणार आहे.


सांगलीत आज तासगाव तालुका बंदची हाक


दोन दिवसांपूर्वी तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त करत शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे यांच्यासह तिघांना कानशिलात लगावली. नंतर प्रदीप माने यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज तासगाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.


नवीन महिला धोरणाचं सादरीकरण


राज्य सरकारच्या नवीन महिला धोरणाचं सादरीकरण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सह्याद्री अतिथीगृह येथे केलं जाणार आहे. त्याचसोबत नवनियुक्त अंगणवाडी सेविकांचं नियुक्तीपत्रही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिलं जाणार आहे.