वसई, पालघर : एखाद्या छोट्या गोष्टीकडे केलेले दुर्लक्ष तुमच्या प्राणावर बेतू शकते. एका महिलेसाठी तिची ओढणी हे मृत्यूचं कारण ठरलं. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, दुचाकीच्या मागील चाकाला महिलेची ओढणी अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. बापाने पुलावरून तुंगारेश्वर येथील महादेवाच दर्शन करुन हे जोडपं परत मुंबईला आपल्या घरी जात होते. त्यावेळी ही दुदैवी घटना घडली आहे.  


व्यवसायाने व्हिडीओ एडिटिंगच काम करणारा मनिषकुमार यादव आणि एका खाजगी कंपनीत काम करणारी त्याची पत्नी प्रतिमा यादव हे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटे 5.30 वाजता पोहचले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते परत आपल्या बुलेटने घरी कांदिवलीला जात असताना, सकाळी सव्वा सातच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील बाफाने पूलावर अचानक मागे बसलेल्या प्रतिमाची ओढणी मागील चाकात अडकली. यामुळे तिचा तोल जावून, ती महामार्गावर पडली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला तिथं  मृत घोषित केले.


नायगांव पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. 


महिलांना आवाहन 


सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांनी बाईकवर मागे बसणाऱ्या महिलांना आवाहन केले आहे. दुचाकीवर बसताना आपली ओढणी, साडीच्या पदराची नीट काळजी घ्या, जेणेकरून अपघात घडणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. 


महामार्गावरील खड्डयात पडून जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. 8 ऑगस्ट रोजी अपघात झाला. मात्र, गेली 10 दिवस ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. 18 ऑगस्टला तिची झुंज अयशस्वी झाली. वसईला बहिणीच्या वाढदिवसासाठी जात असताना खड्डयात पडून दुचाकीचा अपघात झाला होता. 


मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीच्या झालेल्या अपघातात 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मालाड येथे राहणारी 27 वर्षीय पूजा रतन गुप्ता ही वसईत बहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपला दिर दिपक गुप्ता याच्या सोबत बाईकने जात होती. रात्री 9 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पुलावरून दुचाकी खाली उतरत असताना, समोरुन आलेल्या वाहनाच्या लाईटमुळे दीपक गुप्ताला समोरील खड्डा दिसला नाही. त्यामुळे त्याची दुचाकी खड्डयात आदळली. यावेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.