तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पब्जी खेळाच्या व्यसनाने चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या शहरातील 19 वर्षीय युवक गौरव पाटेकर याने पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरीच वास्तव्याला असल्याने त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे व्यसन जडले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी या पब्जी खेळातील एक टास्क पूर्ण होऊ न शकल्याने तो अस्वस्थ होता. अखेर त्याने आज आपल्या जवळच्या मित्राला फोन करत मी निराश झाल्याने आत्महत्या करत असून स्वतःच्या राहत्या घरी असलेल्या छताच्या पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपवले. दरम्यान या खळबळजनक घटनेची चौकशी माजरी पोलीस करत असून पब्जी खेळाचा व्यसनी-क्रूर चेहरा या निमित्ताने पुढे आला आहे.
गौरव हा नागपूर येथील रायसोनी कॉलेज येथे बी.कॉम.(प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला शिकत होता. मात्र लॉक डाउन सुरु झाल्याने तो गेल्या 5 महिन्यांपासून माजरी येथील आपल्या घरीच राहत होता. कॉलेज नसल्यामुळे गौरवकडे भरपूर रिकामा वेळ होता. या रिकाम्या वेळात तो दिवस-रात्र मोबाईल मध्ये व्यस्त असायचा आणि पब्जी गेम खेळत असे. त्याच्या पालकांनी अनेक वेळा त्याला समजविण्याचा आणि यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गौरवच्या वागण्यात फरक पडला नाही.
आई-वडिलांपासून लपून तो हा ऑनलाईन गेम खेळत असे. लॉकडाऊनच्या काळात त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे जणू व्यसन जडले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या पब्जी खेळातील एक टास्क पूर्ण होऊ न शकल्याने तो अस्वस्थ होता. अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो हा टास्क पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे गौरवने आपल्या एका मित्राला फोन करून मी निराश झाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गौरवच्या मित्राने याची माहिती तातडीने त्याच्या भावाला दिली पण त्याचा भाऊ खोलीमध्ये जाऊन पाहतो. तोपर्यंत उशीर झाला होता. गौरवने पब्जीच्या नादात स्वतःच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपविले होते. तरुण मुलाच्या अशा प्रकारच्या आत्महत्येने गौरवचे आई-वडील कोसळून पडले आहे. गौरवचा हा मृत्यू परिसरातील लोकांच्या मनाला चटका लावून गेलाय.
दरम्यान या खळबळजनक घटनेची चौकशी माजरी पोलीस करत आहेत मात्र पब्जी खेळाचा व्यसनी-क्रूर चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. मेट्रो शहरांमध्ये असलेला ऑनलाईन गेमिंग चा विळखा आता ग्रामीण भागावरही घट्ट झालाय. ऑनलाईन गेम्स मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे पण त्याच्या व्यसनाने आणि नैराश्यामुळे मुलं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताहेत हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे.
पब्जी खेळाच्या नादात याआधीही अशा घटना घडल्या आहेत. यवतमाळमध्ये पब्जी गेममुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर पुण्यात एका युवकाचा गेम खेळताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला होता. भिवंडीत पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. तर भिवंडीतील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचीही घटना घडली होती.
संबंधित बातम्या
PUBG Victim | पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, विचित्र हालचाल, असंबंध बडबड
पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे 16 लाख रुपये उडवले!
PUBG खेळू न दिल्याने मुलाने घर सोडले
पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना
पब्जी गेमवरुन वाद, पुण्यातील तरुणावर कोयत्याचे वार, दोन जण पोलिसांच्या ताब्यात