पुणे : पब्जी या मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना अजून ताजी आहे. त्यातच आता शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


सुनील माने (19) असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो हडपसरमधील शिंगोट प्लाझ येथील रहिवासी आहे. याप्रकरणी हेमंतसिंह रजपुत (वय 24, रा. महम्मदवाडी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी सनी पांडुरंग लोंढे (18), करण वानखेडे (22)या दोघांना अटक केली आहे.

फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील रविवारी सायंकाळी सहा वाजता फिर्यादी व आरोपी लोखंडीपुलाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी सनी लोंढे याने पब्जी गेम खेळण्यासाठी फिर्यादी रजपुत याच्याकडील मोबाईल मागितला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र सुनील माने याने सनी लोंढे यास मोबाईल देत नाही, असे सांगितले. त्यामुळे सनी व सुनील या दोघांमध्ये बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले.

भांडण सुरु झाल्यावर सनीचा मित्र करण वानखेडे याने सुनील माने यास आता सोडायचे नाही, त्यास जीवे मारायचे, असे म्हणत त्याच्याजवळील कोयता काढून सुनील माने याच्या डोक्‍यात घातला. लोंढे आणि वानखेडे यांनी त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माने गंभीर जखमी झाल्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर फिर्यादी व स्थानिक नागरीकांनी सुनीलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले .