मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात.   आज अल्पसंख्याक हक्‍क दिवस  (Minority Rights Day 2022) आहे. आजच्याच दिवशी क्रिकेटपटू  विजय हजारे यांचं निधन झालं होतं  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


आज अल्पसंख्याक हक्‍क दिवस  


आजच्या दिवशी जगभरात अल्पसंख्याक हक्क दिवस ( International Minorities Rights Day)साजरा करण्यात येतो.  संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, परंपरांचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  या दिनानिमित्त अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव आणि त्यांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते 


 
1756 : छत्तीसगडचे सुप्रसिद्ध संत गुरु घासीदास यांचा जन्म. (Sant Guru Ghasidas)


छत्तीसगड राज्यातील संत परंपरेत गुरु घासीदास यांचं स्थान सर्वात वरचं आहे. त्यांनी समाजात प्रचलित असलेल्या पशुबळी आणि इतर वाईट प्रथांना विरोध केला. समाजाला नवी दिशा देण्यात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. गुरु घासीदास यांना 'सतनाम पंथ'चे संस्थापक देखील मानले जाते.


1856 : सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म ( J. J. Thomson British physicist)


इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ  सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. इलेक्ट्रॉनच्या शोधाचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या मुलासह त्यांच्या सात विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. 30 ऑगस्ट 1940 रोजी त्यांचं निधन झालं.


1887 : भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर' भिखारी ठाकूर  यांचा जन्म (Bhikhari Thakur)  


भोजपुरी लोककलाकार, लोकगीते आणि भजन कीर्तनाचे अनन्य साधक, लोक प्रबोधनकार, नाट्य कलाकार भिखारी ठाकूर यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. ते बहुआयामी प्रतिभेचा धनी असलेलं व्यक्तिमत्व होतं.  भोजपुरी गाणी आणि नाटकांसह त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध होते.  भिखारी ठाकूर यांची मातृभाषा भोजपुरी होती आणि त्यांनी भोजपुरी ही आपल्या कविता आणि नाटकाची भाषा बनवली.


1890 : एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म


एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग हे अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक होते. ज्यांनी एफएम (फ्रिक्वेंसी मॉड्युलेशन) रेडिओ आणि सुपरहेटेरोडाइन रिसीव्हर सिस्टम विकसित केलं होतं.  त्यांनी 42 पेटंट मिळवले आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले.  त्यांचा नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या महान शोधकांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे.


1955 : विजय मल्ल्याचा जन्म   (Vijay Mallya)


सध्या फरार असलेला आणि नेहमी चर्चेत असलेला भारतीय उद्योजक आणि माजी राज्यसभा खासदार विजय मल्ल्याचा आज जन्मदिवस.  2008 मध्ये  सुमारे ₹72 अब्ज संपत्तीसह जगातील 962 व्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.  भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये तो 42 व्या क्रमांकावर होते. भारत सरकारने विजय मल्ल्याला फरारी घोषित केले आहे कारण तो विविध भारतीय बँकांचे 9000 कोटी हडप करून पळून गेला आहे. सध्या तो विदेशात असून त्याचे प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


1961 :  माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म (Lalchand Rajput) 


 माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद सीताराम राजपूत यांचा जन्म मुंबईत झालेला.  लालचंद राजपूत त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त दोन कसोटी क्रिकेट सामने खेळू शकले. याशिवाय त्याने आपल्या कारकिर्दीत फक्त 4 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले. जेव्हा त्यांनी आपली क्रिकेट कारकीर्द संपवली तेव्हा नंतर त्याने भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम केले. यासोबतच त्यांनी मुंबई क्रिकेट असिस्टंटचे व्यवस्थापकीय कामही सांभाळले.


1993:  राजा बारगीर यांचं निधन


मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचं आजच्याच दिवशी निधन झालेलं. त्यांनी सुखाचे सोबती, बोलकी बाहुली, देवा तुझी सोन्याची जेजुरी, मानाचा मुजरा, करावं तसं भरावं, दीड शहाणे, ठकास महाठक, गडबड घोटाळा, तुझी माझी जमली जोडीअशा सुमारे 90 मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.  


2004 : क्रिकेटपटू  विजय हजारे यांचं निधन (Vijay Hazare) 


क्रिकेटपटू  विजय हजारे यांचा जन्म सांगलीत मराठी कुटुंबात 11  मार्च 1915 रोजी झाला.  प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 238 सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी 58.38 च्या सरासरीने 18740 धावांचा पाऊस पाडला. प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते.  प्रथमश्रेणीत 60 शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. हजारे यांनी 30  कसोटींमध्ये  2192 धावा केल्या. तर 20  बळी देखील घेतले.  महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली.   पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांची आयुष्याची इनिंग कर्करोगाच्या दीर्घ आजारानं वडोदरा येथे संपली. 


इतर महत्त्वाच्या घटना 


1787 : न्यू जर्सी या देशानं अमेरिकेचे संविधान स्वीकारले
1916 : पहिल्या विश्व युद्धात वेरदूनला झालेल्या लढाईमध्ये फ्रांसने जर्मनीला हरवले
1995 : टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना  आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार जाहीर