Shiv Sena MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीचा (Shiv Sena MLA Disqualification Case) शेवटचा अंक आजपासून सुरू आहे. आजपासून पुढील तीन दिवस अर्थात 20 डिसेंबरपर्यंत सुनावणीतील अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटातील (Shiv Sena Eknath Shinde) आमदारांच्या उलट तपासणीनंतर लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. त्यानंतर आता दोन्ही गटांचे वकील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर युक्तिवाद करणार आहेत.


शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुभा दिली आहे. याआधी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. 


साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेला आमदार अपात्रतेच्या वादाचा निकाल हा 10 जानेवारीपर्यंत लागणार आहे. 


अंतिम सुनावणीस आजपासून सुरुवात


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सकाळी साडेआठ वाजता सकाळच्या सत्रातील अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रातील अंतिम सुनावणी होणार आहे. 18, 19 आणि 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत.  


शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील या प्रकरणातील सुनावणीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे.  यानंतर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणाचा निकाल देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपेक्षित आहे. 


दोन्ही बाजूंकडून उलट तपासणी 


विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना ठाकरे आणि शिवेसना शिंदे गटाच्या वकिलांनी उलट तपासणी घेत साक्ष नोंदवली.शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनीस प्रभू यांची उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी घेतली. त्यावेळी अॅड. जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना व्हीपच्या मुद्यावर घेरले. प्रभू यांनी व्हीप जारीच केला नाही हे ठरवण्याच्या अनुषंगाने प्रश्न केले. जेठमलानी यांच्या प्रश्नांवर प्रभू यांनीदेखील जोरदार पलटवार केला. अॅड. जेठमलानी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधीमंडळ कार्यालयीन सचिव  विजय जोशी यांचीदेखील साक्ष नोंदवली. तर, ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली. अॅड. कामत यांच्या उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप मिळाला नसल्याचे म्हटले होते. कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांकडून दिशाभूल केली जात असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, उदय सामंत, योगेश कदम, दीपक केसरकर, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी झाली. यातील काही आमदारांनी आपण ठाकरे गटाच्या बैठकीत उपस्थित नसल्याचा दावा करत कोणत्याही कागदपत्रांवर, ठरावावर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला.