अहमदनगरच्या 16 वर्षीय शिवराजची विश्वविक्रमाकडे कूच, 24 तासात 450 किमी सायकलिंग
शिवराजने संगमनेर, नाशिक, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदौर या मार्गावर सलग सायकल 450 किमीचं अंतर 24 तासांहून कमी वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम आपल्या नावे केला.

शिर्डी : सलग 24 तास सायकल चालवत संगमनेर ते इंदोर प्रवास करत 16 वर्षीय शिवराज थोरात याने विश्वविक्रम मोडीत काढला आहे. याआधी 24 तासात 16 वर्ष आतील असलेला 430 किमीचा विश्वविक्रम शिवराजने मोडीत काढला असून 28 जूनला आपल्या क्रू सदस्यांच्या मदतीने त्याने हा प्रवास दिवस रात्र प्रवास करत पूर्ण केलाय. लवकरच याची गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होणार असून शिवराजच्या या विश्वविक्रमाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील धनंजय थोरात यांचा मुलगा शिवराज. वयाची 15 वर्ष पूर्ण करून 16 व्या वर्षात पदार्पण केलेल्या या शिवराजला सायकलिंगची अनेक वर्षांपासून आवड निर्माण झाली. गेली अनेक वर्षांपासून तो सायकलिंग करत असून संगमनेर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तो सायकलिंगचे धडे गिरवतो. अशात 16 वर्षा खालील 24 तासात 430 किमी सायकलिंगच्या विश्वविक्रमाची त्याला माहिती मिळाली आणि त्याने हा विक्रम मोडण्याचा निश्चय केला. त्यानुसार तो रोज पहाटे लवकर उठून सराव करू लागला. आम्हाला आधी जे कठीण वाटलं मात्र शिवराजचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर आम्ही त्याला साथ दिली आणि हा प्रवास यशस्वी केल्याची माहिती राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.
दीड महिना सराव केल्यानंतर आम्ही 28 जून तारीख निवडली आणि प्रवास कसा करायचा हे ठरवलं. यावेळी संगमनेर ते इंदोर (संगमनेर, नाशिक, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदौर) या मार्गावर सलग सायकल चालवून त्याने विश्वविक्रम आपल्या नावे केला. हा प्रवास रूट अंतिम करून आम्ही पहाटे प्रवासाला सुरवात केली आणि 450 किमी अंतर शिवराजने 23 तासांतच पूर्ण केलं याचा आम्हाला अभिमान वाटतोय, असं त्याच्या क्रू मेंबरने सांगितलं.
28 जूनला प्रवास सुरु केल्यानंतर संगमनेर ते धुळे पर्यंत प्रवास सोपा होता. मात्र 200 किमी नंतर घाट रस्ता आणि पाऊस यामुळे त्रास जाणवू लागला. दिवसभर प्रवास केल्यानंतर घाट रस्ता आल्यानंतर थकवा जाणवत होता. मात्र सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीमुळे हा प्रवास पूर्ण करू शकलो, अशी प्रतिक्रिया शिवराजने दिली आहे.
ग्रामीण भागातील युवा सायकलिस्ट शिवराज थोरात याने 16 वर्षे वयोगटातील पूर्वीचा 431 किलोमीटरचा सायकल चालवण्याचा विश्वविक्रम 28 जून रोजी संगमनेर ते इंदौर हे 450 किलोमीटरचे अंतर सलग 23 तास सायकल चालवून मोडीत काढला. त्याने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हे ही आपल्या नावे केलेत. लवकरच या तिन्ही संस्थांकडून त्याला सर्टिफिकेटही मिळेल. मात्र ग्रामीण भागातील या युवा सायकलिस्टच्या सायकलिंगने ग्रामीण भागाचे नाव देशात पोहचवलं हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
