Rain Update: राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण! शेतकऱ्यांचं स्वप्न झालं भुईसपाट, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाच सर्वत्र एकच थैमान घातल्याचे चित्र आहे.
Maharashtra Weather Update :राज्याच्या काही भागामध्ये सुरुवातील ऑक्टोबर हिटचा (October Heat) परिणाम जाणवू लागला होता. मात्र ऑक्टोबरच्या शेवटाला पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, अकोला, पालघर, बुलढाणा (Buldhana) इत्यादि अनेक जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाच थैमान घातल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वअधिक फटाका फळबागांसह धानपिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काढलेली पिके भिजली आहेत.
यात विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
शेतकऱ्यांचं स्वप्न झालं भुईसपाट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मध्यरात्री झालेल्या पावसानं झोडपले आहे. रात्री अकरा वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होता. या जोरदार पावसाने शेताची तळी झाली आहेत आणि या शेततळ्यामध्ये शेतकऱ्यांची काढलेली मका बोंड फुटलेली कपाशी तुर यासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.परिणामी शेतकऱ्यांची सहा महिन्याची मेहनत वाया गेली आहे.
परभणीच्या येलदरीचे 10 तर लोअर दुधनाचे 6 दरवाजे उघडले
परभणी जिल्ह्यात शनिवारच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हर फ्लो झालेत. दरम्यान, येलदरी प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले असुन तब्बल 29 हजार 481 क्युसेक्स वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्णा नदी दूथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे लोअर दुधना प्रकल्पाचे ही 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 6 दरवाज्यांमधून 10 हजार 20 क्युसेक्स वेगाने पाणी दुधना नदीत सोडण्यात आले असून दोन्ही प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर्णा आणि दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा