सोलापूर: मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे (Indian Railway) यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं. रेल्वे पोर्टलवर (India Rail) गाडी रद्द झाल्याची अपडेट होती, ऑनलाईन तिकीट बुकिंग ही होत नव्हतं, मात्र गाडी सुसाट तीही विना प्रवाशी धावत असल्याचं चित्र आज दिसलं. यामुळे प्रवासी तर गोंधळात पडलेच पण रेल्वे कर्मचारी संभ्रमात पडल्याचं दिसून आलं. 


सोलापूर-कुर्ला (Solapur Kurla Express) ही अस्थायी रेल्वे मागील एक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. सोलापूर, गुलबर्गा, बिदर, उदगीर, लातूर या मार्गे कुर्ल्याकडे जाते. मध्य रेल्वे सोलापूर विभागाची ही रेल्वे आहे. ट्रेन ऑन डिमांड या तत्त्वानुसार ही गाडी चालू आहे. आठवड्यातील दर मंगळवारी ही गाडी सोलापूरवरून निघून बुधवारी कुर्ला येथे पोहोचते. भविष्यात वाढत्या प्रवासाच्या संख्येनुसार या गाडीची फेरे वाढवण्याची शक्यता होती. मात्र आज सोलापूर टर्मिनल बोर्डवर ही गाडी कॅन्सल असल्याचं दाखवत होतं. 


रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर ही गाडी रद्द असल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात या गाडीने प्रवास सुरू केला. ऑनलाइन बुकिंग होत नाही, पोर्टलवर गाडी दिसत नाही म्हणून या गाडीचे तिकीट मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नेमकं काय झालं हे कळत नाही. रेल्वे पोर्टलवर गाडी अधिकृत रद्द असताना दिसत होतं. त्यामुळे रेल्वे कर्मचारी तिकीट देत नव्हते. 


गाडी पोर्टलवर रद्द असतानाही गाडीने प्रवास सुरू केल्याने अनेक प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहेत. गाडीला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सिंग्नल मिळतोय, ग्रीन पास मिळतोय. मात्र रेल्वे कर्मचारी गाडी रद्द असल्याने तिकीट देत नाहीत. प्रवाशांना विना तिकीट प्रवास करण्याची भीती आहे. यामुळे गोंधळात मोठी वाढ झाली आहे.


दक्षिण-मध्य रेल्वेचे झोनल सल्लागार सदस्य असलेले मोतीलाल डोईजोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे सोलापूर विभागातून 01435 क्रमांकाची रेल्वे गाडी सोलापूर वरून कुर्ला येथे पोहचते. गेल्या वर्षीपासून ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. दर दोन महिन्यांनी प्रवाशांची संख्या पाहून या गाडीला मुदत वाढ देण्यात येत आहे. नुकतेच मध्य रेल्वेने ही गाडी कॅन्सल झाल्याचे परिपत्रक काढलं होतं. मात्र ही रेल्वे दक्षिण मध्य विभागातून मार्गस्थ झाली. या भागात गाडी रद्द असल्याची माहिती पोर्टलवर आहे म्हणून तिकीट विक्री करण्यात आली नाही. गाडी धावत आहे मात्र प्रवाशांना तिकीट विक्री करण्यात आली नाही. सोलापूर विभागातून अशी गंभीर चूक कशी झाली याची माहिती उपलब्ध होत नाही.


दर मंगळवारी या गाडीने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी कुचंबना झाली. अधिकृत तिकीट मिळत नाही, गाडी तर समोर दिसते, जी रिकामी आहे. काय करावे हे न सुचल्याने अनेक प्रवाशांनी प्रवास रद्द करणेच पसंत केलं आहे.


ही बातमी वाचा: