लातूर : आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीच्या कमरेला धरुन विहिरीत उडी मारली. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथे घडली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (26) असे मयत आईचे नाव आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव (क.) येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करीत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. 


दीदीचं शेवटचं तोंड पाहा म्हणत विहिरीत घेतली उडी


दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी मुलीला सोबत घेऊन पत्नी गावाबाहेर पडली. त्यांनी गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पाहा, असे म्हणत विहिरीत उडी घेतली.


पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू 


या घटनेत पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे वडील यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल दुरपडे करीत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Crime : घरगुती वाद, अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट, नांदगाव हादरले


Virar Crime News: विरारच्या साईनाथ नगरमध्ये दारुच्या नशेत तर्राट जावयाने सासूला संपवलं, मुलांनी बापाला खोलीची कडी लावून पकडून दिलं