लातूर : वंचित बहुजन आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातून (Latur Lok Sabha Election) पराभूत झालेले उमेदवार नरसिंग उदगीरकर (Narsing Udgirkar) यांनी एकाच दिवशी चार कोटी किमतीच्या गाड्या बुक केल्या. त्यांनी टाकलेली नव्या गाडीसह पोस्ट व्हायरल होत असून  सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर नरसिंग उदगीरकर यांच्या मुलाने स्पष्टीकरण दिलं आहे. 


लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेले नरसिंग उदगीरकर हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. लातूर लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे 61,881 मताने निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला होता. सर्वाधिक तिसरी मते घेणारे उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर. नरसिंग उदगीरकर यांना 42 हजार 225 मते पडली होती.


निवडणुकीच्या काळात नरसिंग उदगीरकर हे जेवढे चर्चेत नव्हते त्यापेक्षा अधिक पराभूत झाल्यानंतर चर्चेत आले आहेत. त्याला कारण म्हणजे त्यांनी एकाच दिवशी घेतलेल्या गाड्या. एक रेंज रोवर (Range Rover) आणि एक फॉर्च्यूनर (Toyota Fortuner) अशा दोन गाड्या त्यांनी घेतल्या आहेत. या गाड्यांची डिलिव्हरी सहा महिन्यानंतर होणार आहे. सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट पडली आणि चर्चेला उधाण आलं.


कोण आहेत नरसिंग उदगीरकर?


लातूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे नरसिंह उदगीरकर यांना तिकीट देण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी नरसिंग निवृत्तीराव उदगीरकर यांनी उदगीर विधानसभा राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती.
  
महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून सन 1982 मध्ये उद्योग अधिकारी म्हणून उद्योग संचलनालय मुंबई येथे नियुक्ती होती. त्यानंतर पदोन्नतीने उद्योग उपसंचालक म्हणून त्यांनी सेवा बजावली. दिनांक 31-08-2012 रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला. व्यंकटेश उदगीरकर आणि योगेश उदगीरकर हे त्यांची दोन मुले बांधकाम व्यवसायिक म्हणून मुंबई या ठिकाणी काम करतात. 


मुलांनी वडिलांना गिफ्ट देऊ नये का? 


नरसिंग उदगीरकर यांचे पुत्र योगेश उदगीरकर यांनी या चर्चेवर मत मांडलं आहे. ते म्हणाले की, माझ्या वडिलांचे उत्पन्न आहे ते निवडणुकीत दाखवण्यात आलं आहे. आम्ही दोन भाऊ बांधकाम व्यवसाय करतो. वडील निवडणुकीला उभे राहताना त्यांना निवडणुकीला सामोरे जा, जिंकू किंवा हरू असं ठरलं होतं. मात्र तुम्हाला एक छान सरप्राईज आम्ही देऊ असं ठरलं होतं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. आम्ही ठरवल्याप्रमाणे वडिलांसाठी गाडी घेतली. पुढील सहा महिन्यानंतर या गाड्यांची डिलिव्हरी होईल. यात काही चूक आहे अशा प्रकारे सगळे रंगवले जात आहे, जे खूप चुकीचे आहे. वडिलांसाठी मुलांनी काही घेतलं तर याच्यात कोणाला का आक्षेप असावा ? 


ही बातमी वाचा: