लातूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याचा निर्णय राज्यातील अनेक गावांनी घेतला आहे. असाच निर्णय लातूर जिल्ह्यातील (Latur News) वाढवणा या गावाने घेतला आहे. वाढवणा हे आहे गाव उदगीर विधानसभा मतदारसंघ मधील आहे. या मतदारसंघाचे आमदार हे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) हे आहेत. मंत्री संजय बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी हा ताफा अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी साठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडल्या आहेत.
चिमाची वाडी येथील एका कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे आज आले होते. ते वाढवण येथील पाटीवर आल्यानंतर यावेळी आंदोलकांनी हातामध्ये भगवे झेंडे घेत कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या ताफा अडवला. यावेळी पोलिसांनी संरक्षण कवच तयार करत संजय बनसोडे यांच्या कारला संरक्षण दिले. मात्र, आंदोलकांची घोषणाबाजी सुरू असताना संजय बनसोडे हे स्वत: गाडीच्या खाली उतरले आणि आंदोलकांशी चर्चा केली.
आमचा आवाज बना आम्ही तुमच्या पाठीशी....
मुख्यमंत्र्यासमोर आमचे लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणसाठी संघर्ष करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती. या मागणीला उत्तर देताना संजय बनसोडे यांनी सागितले की, मी मंत्री नसतो आणि आरक्षण कमिटीमध्ये नसतो तर भगवी टोपी घालून मी ही तुमच्या बरोबर राहिलो असतो. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरक्षण कमिटी हे 100 टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने काम करत आहेत. मीदेखील तुमच्याच बाजूने आहे, असे सांगत आंदोलकांशी चर्चा केली.
संजू भाऊ तुम्हाला मतदान करतो, आज सहकार्य करा...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलकांनी केली. निवडणुकीत आमचं मत तुम्हालाच आहे. मात्र, या वेळेस वाढवणा गाव असेल किंवा इथला पुढचा आपला दौरा आहे तो रद्द करा अशी मागणी आंदोलकांनी जोर लावत लावून धरली. संजय बनसोडे यांनी ही आंदोलकांशी काही काळ चर्चा केली आणि त्यानंतर ते पुढील नियोजित दौऱ्यासाठी निघून गेले.