बारामती : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची ठिणगी आता राज्यभरात वणव्याचे रुप घेत आहे. आज बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मराठा युवकांनी घेराव घातला. यावेळी अजित पवारांनी त्यांना आपली मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका समजवून सांगितली.
बारामती तालुक्यातील पणदरे येथील सभा संपल्यानंतर मराठा समाजाच्या युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेराव घातला. यावेळी मराठा युवकांनी आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असे विचारले. त्यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटंकाबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये माहिती घेतली असता मराठा समाजातील 10 पैकी 8 टक्के लोक हे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
अजित पवारांचा सत्कार
बारामतीत आज पणदरे गावात उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी केशवराव जगताप यांची निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी काहीही करणारं नाही. कायद्याच्या कसोटीवर खरं उतरणारे आरक्षण देणार असून तसे प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. मी देखील मराठा समाजात जन्माला आलो आहे. अजित पवारांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही. पण ज्यांना गरज आहे त्यांना मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडताना
जर एकाला आरक्षण देताना दुसऱ्याला आरक्षण धक्का लागणार असेल तर शक्य होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजासाठी 10 टक्के EWS कोटा मान्य नाही; अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल
मराठा समाजासाठी (Maratha ) 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास घटकाचे आरक्षण मान्य नसल्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले. मराठा समाजाने आरक्षण (Maratha Reservation) मागण्याऐवजी 10टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा (EWS Reservation) पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला आहे.
Baramati Ajit Pawar Maratha Community : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव