Agriculture News : सध्या राज्यातील सोयाबीन (soybean) उत्पादक शेतकरी संकटात आहे. कारण सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. रस्ता रोको, धरणे, उपोषण, आंदोलन करुन उपयोग होत नसल्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आज सरकारची महाआरती करत साकड घातलं आहे. पावसामुळं सोयाबीन उत्पादनात तूट झाली आहे, किमान भाव तर योग्य द्यावा. दिवाळी गोड करावी अशी मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली. सरकार प्रसन्न झाले तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल यासाठी महाआरती केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


सरकारची महाआरती करत शेतकऱ्यांनी मांडलं गाऱ्हाणं


यावर्षी पावसानं सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्यामुळं सर्वच शेतमालाच्या उत्पादनात घट झाली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी सोयाबीन उत्पादन तूट दिसून येत आहे. त्यातच सोयाबीनाला कमी भाव मिळतोय. सरकारने आम्हाला आर्थिक मदत न देता किमान सोयाबीनसाठी योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. आज लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारची महाआरती करत गाऱ्हाणे मांडले. शेतमालाच्या भावासाठी सातत्याने अनेक आंदोलने धरणे रस्ता रोको करण्यात आले आहेत. मात्र सरकारवर या सर्व बाबीचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्यामुळं शेवटी सरकारला प्रसन्न करुन घेण्यासाठी पान चिंचोली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकारच्या महाआरतीचं आयोजन केलं होतं. पान चिंचोली येथील शिवारात सोयाबीनची रास करण्यापूर्वी महाआरती करण्यात आली आहे.


उत्पादनासाठी मोठा खर्च, दर मात्र घटले


एक एकर सोयाबीनसाठी लावणीपासून काढणीपर्यंत किमान बावीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च येतो. पावसानं पाठ फिरवल्यामुळं शेतकरी अडचणीत आला होता. उत्पादन घटले आहे. त्यातच भाव मिळाला नाही. आता आम्ही काय कराव?  मुलाचे शिक्षण, दवाखाना, दिवाळी हा सगळा खर्च कसा भगवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 


सरकारनं आमच्या व्यथा समजून घ्याव्यात 


मागील अनेक काळापासून सरकार विरोधात वेगवेगळी आंदोलन करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे, विविध मार्गाने सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सरकारला जागच येत नाही त्यामुळं शेवटी आरती करण्याचा निर्णय घेतला. आता तरी आमच्या व्यथा सरकारनं समजून घ्याव्यात ही विनंती, अशी प्रतिक्रिया अभय साळुंखे यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : नफा सोडा उत्पादन खर्चही निघणं कठीण, सोयाबीन उत्पादक संकटात; शुभारंभालाच मिळतोय 'एवढा' दर