लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही, गिणत सुद्धा नाही अन् मरायलाही भीत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. लातूर (Latur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी जाहीर सभेतून सरकराला हा इशारा दिला आहे. 


यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "माझ्या समाजापेक्षा मला कोणीच मोठं नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलं आहे. मी शेवटच्या टोकापर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांसाठी संघर्ष करणार असून, मी काहीही चुकीचं करत नाही. सरकार मला शत्रू समजत आहे. मी काय चूक केली. गोरगरिबांच्या लेकरांसाठी न्याय मागितला, मराठ्यांचा मुलगा एका टक्क्याने हुकला तर घरी रडत येतो. आणि हेच मी मांडत आहे. मराठा समाजाचे लोकं मोठ्या कष्टाने आपल्या लेकरांना शिकवायला लागले. पण, त्यांच्या मुलांना न्याय मिळत नाही. हीच मागणी मी मांडली आहे. आम्हाला आरक्षण होते, पण ते का दिलं नाही, हेच मी सरकारला विचारत आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे मुलं मोठे झाले पाहिजे यासाठी मी जीव हातावर घेऊन रात्र आणि दिवस फिरतोय. यात मी काय चुक केली. आणि तरीही तुम्ही मला शत्रू समजत असाल, तर मी सरकारला मोजत नाही, गिणत सुद्धा नाही अन् मरायला देखील भीत नाही," असे जरांगे म्हणाले. 


कुऱ्हाडीची-कोयत्याची भाषा आम्हाला शिकवू नका...


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,"माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तोपर्यंत सरकारची सुट्टी नाही. तुम्ही कितीही टोळ्या निर्माण करा, त्याच टोळ्या उध्वस्त करण्याची ताकद माझ्या मराठा समाजाच्या मनगटात आहे. मराठ्यांना सहज समजू नका, मराठा शांत आहे, त्याला शांत राहू द्या, जास्त डिवचण्याचा प्रयत्न केल्यास होणारे आंदोलन तुम्हाला जड जाईल हे लक्षात ठेवा. कुऱ्हाडीची भाषा, कोयत्याची भाषा आम्हाला शिकवू नका. आमच्याही घरात काहीतरी आहे हे तुम्हाला माहित आहे. आमच्या नादाला लागू नका. मराठ्यांनो शांत रहा संयम ठेवा. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार यात काहीही शंका नाही. फक्त आणखी काही जनजागृती करा, असे जरांगे म्हणाले.


मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही


उद्यापासूनच आंदोलनाच्या तयारीला लागा. मात्र आंदोलन शांततेत करायचा आहे. आता एकदा होऊ द्या, जे व्हायचं ते होईल. एवढ्या ताकतीने जनजागृती करा की, मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला नको पाहिजे. पुढच्या काळात मराठा समाजाच्या लेकरांचं आरक्षणामुळे वाटोळं होता कामा नाही. जेवढ्या ताकतीने शेतात काम करतो, तेवढ्याच ताकतीने शांततेच्या आंदोलनात सहभाग नोंदवा. मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Vs Nitesh Rane : 'फडणवीसांवर टीका कराल तर गाठ...'; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा