मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, अन्यथा त्यांची गाठ या मराठ्यांशी आहे हे लक्षात राहू द्यावं, असं थेट इशारा राणे यांनी जरांगेंना दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या मनोज जरांगींच्या विरोधात भाजप नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना नितेश राणे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर तुम्ही टीका कराल, तर आम्ही कधीही हे सहन करणार नाही. त्यामुळे आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष कोण टाकतोय, तुमची भाषणं कोण लिहून देतोय, तुमच्या तोंडातून मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण बोलायला लावतोय याची आम्हाला पुराव्यासहित यादी काढावी लागेल. मराठा आरक्षणाबद्दल बोलत रहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे हे लक्षात राहू द्या, असा इशारा राणे यांनी दिला आहे. 


काय म्हणाले होते जरांगे? 


लातूर येथे बोलतांना जरांगे म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला सांगितलं आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असे देखील,"जरांगे म्हणाले होते. 


मनोज जरांगे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...


मनोज जरांगे पाटील यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे जाहीर सभा काही वेळात होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील समाज बांधवांनी गर्दी केली आहे. यात लक्षणीय संख्या ही महिला वर्गाची आहे. तसेच तरुण मुला-मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लातूर जिल्ह्याच्या तीन दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा आहे. तर, त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तसेच, काल झालेल्या तीन ही सभेला समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. ज्यात निलंगाची सभा यात लक्षवेधी ठरली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'फडणवीसांनी आत्ताच शहाणं व्हावं नाहीतर त्यांचा डाव उधळून लावू', मनोज जरांगेंचा इशारा