Latur News: राज्यातील काँग्रेस पक्षात (Congress Party) सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरुद्ध दुसरा गट असे वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या काँग्रेस पक्षातील गटबाजीची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र पक्षातील गटबाजी फक्त वरिष्ठ पातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवर देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात देखील अशीच काही गटबाजी सुरु असून, यात माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना खुद्द हस्तक्षेप करावा लागला आहे. 


काँग्रेस पक्षाचा शत्रू हा विरोधीपक्ष नसून, स्वकियच असतात असं काँग्रेस पक्षाबद्दल नेहमी बोलले जात होते. आधी देश पातळीवरील पक्षातील गटबाजी काही दिवसांपासून राज्य पातळीवर पाहायला मिळत आहे. तर आता हीच गटबाजी थेट जिल्हापातळीवर येऊन पोहचली आहे. कारण लातूर येथील अमित देशमुख गटाच्या कार्यक्रमास बसवराज पाटील मुरूमकर गटाचे कार्यकर्ते गैरहजर राहिले. त्यामुळे अखेर जाहीर कार्यक्रमात अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील गटबाजीवर थेट भाष्य केले.  "राज्यपातळीवर तीन पक्षाचे नेते एकत्र येऊ शकतात. सत्ता स्थापन करू शकतात. मग औसा विधानसभा मतदारसंघातील तीन काँग्रेसचे नेते एकत्र का येऊ शकत नाही? असा प्रश्न करत अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजीच्या राजकारणवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. 


काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली 


औसा तालुक्यातील नूतन सरपंच आणि सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर श्रीशैल उटगे हे देशमुख गटाचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार बसवराज पाटील याचे समर्थक गैरहजर राहिले. त्यात युवक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, माजी तालुका अध्यक्ष शेषेराव पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. 


पहिल्यांदाच गटबाजीवर वरिष्ठ नेत्याचे भाष्य 


मुळात औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची गटबाजी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दोन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा गट इथे कायमच सक्रिय राहिलेला आहे. त्यांच्या विरोधात अमित देशमुख गटाचे कार्यकर्तेही विरोध दर्शवत सक्रिय राहत होते. मात्र गेल्या वेळेला भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांना देशमुख गटाने बळ देत बसवराज पाटील यांचा पराभव केला असं काँग्रेसमध्ये सर्रास बोललं जातं होते. या बाबत दोन्ही गटांचे समर्थक बऱ्याच वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र हा संघर्ष स्थानिक पातळी पर्यंतच मर्यादित होता. मोठ्या नेत्यासमोर हा संघर्ष कधीही उफाळून आला नाही किंवा नेत्यांनी तो व्यक्त केला नव्हता. मात्र पहिल्यांदाच यावर अमित देशमुख यांनी भाष्य केले आहे. 


“तेरा वर्षापासून मी युवक काँग्रेसचं काम करतो, मात्र आजच्या कार्यक्रमात आम्हाला कोणालाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. कायमच आम्हाला काँग्रेसच्या कार्यक्रमापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपाचा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम पार पडतो की काय अशी आम्हाला शंका असल्याचा,” थेट आरोप युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष हनुमंत राचट्टे यांनी केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Nana Patole: सत्यजीत तांबे यांच्या आरोपावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया, म्हणाले, तो प्रश्न....