मुंबई: सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपांवर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सत्यजीत तांबे यांच्या विषयावर मी काही बोलणार नाही, ते काम पक्षाचे प्रवक्ते करतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर पक्षाने योग्यच एबी फॉर्म दिला होता, त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असंही म्हटलं होतं, त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं. 


काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "ते फॉर्म काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांच्या ओएसडींना देण्यात आले होते, त्या फॉर्मचा स्क्रिनशॉट पाठवण्यात आला होता. त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असं उत्तरही मोबाईलवरून दिलं होतं. सत्यजित तांबेंनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पक्षाचे प्रश्न पक्ष पातळीवरच सोडवले पाहिजेत. सत्यजित तांबेनी कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थित उत्तर दिलं नाही."


उमेदवारी अर्ज भरायच्या आधी एक दिवस आपल्याला पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला होता. त्या आरोपावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 


सत्यजीत तांबे यांचे आरोप काय?


सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही त्यांनी केला. 


त्याचसोबत एवढं वर्षे पक्षामध्ये काम करुनही आपल्याला संधी डावलण्याचं काम तसेच तांबे आणि थोरात कुटुंबारा बदनाम करण्याचा डाव पक्षातील काही नेत्यांनी केल्याचा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला. एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.


मी भविष्यात अपक्षच राहणार


मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात नेहमी वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही असं सत्यजीत तांबे म्हणाले. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं. 


मी प्रदेशाध्यक्ष असतो तर सत्यजीत तांबेला एका मिनीटात पाठिंबा जाहीर केला असता आणि त्यावर पक्षाचा शिक्का मारला असता असं सत्यजीत तांबे म्हणाले. हे प्रदेश काँग्रेसने केलं नसल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.