Latur News: मागील पंधरा दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. सोबतीला शंखी गोगलगाय आणि पैसा सारखे पीक खाणाऱ्या कीटकांची त्यात भर पडली आहे. त्यातच अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असले तरीही, गोगलगाय संदर्भात काय भूमिका घ्यावी याबाबत कृषी विभाग अजूनही संभ्रम अवस्थेत आहे. तर दुसरीकडे बाधित झालेल्या क्षेत्राचे आकडेवारी ही धडकी भरवणारी ठरत आहे. 


लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यात यावर्षी सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आषाढी एकादशीपासून पावसाने जी साथ द्यायला सुरवात केली, ती अजूनही सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान पिकांवर गोगलगाय सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रत्येक शिवारात गोगलगायीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या गोगलगायीचा प्रादुर्भाव दर दिवशी वाढताना पाहायला मिळतोय. त्यातच आता पैसा सारख्या आणखी एका कीटकाचा प्रादुर्भाव पिकांवर पाहायला मिळत असल्याने नवीन संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 


कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती...


लातूर जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. ज्यात लातूर तालुका 15 हजार 509 हेक्टर, औसा तालुका 17 हजार 988 हेक्टर, रेनापुर तालुका 323 हेक्टर, उदगीर तालुका 63 हेक्टर, देवणी तालुका 24 हजार 586 हेक्टर, चाकूर तालुका 13 हजार 743 हेक्टर, जळकोट तालुका 5 हजार 413 हेक्टर, शिरूर अनंतपाळ तालुका 8 हजार 947 हेक्टर असून, निलंगा आणि अहमदपूर तालुक्याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी एकट्या लातूर जिल्ह्याची असून, प्रादुर्भाव झालेल्या विभागातील इतर जिल्ह्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. 


कृषी विभाग संभ्रम अवस्थेत...


एकीकडे गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर सुरु असतांना दुसरीकडे, कृषी विभागाच्या ॲपमध्ये गोगलगायीचा उल्लेख कोणत्या सदरात करावा याचे निर्देश प्राप्त झाले नसल्याने कृषी विभाग संभ्रम अवस्थेत आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कृषी विभागाने माहिती गोळा केली आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरून निर्देश येत नसल्याने ते सुद्धा हतबल झाले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Latur News : ब्रेन डेड असलेल्या लातूरच्या सिंधुताई तळवार यांचे अवयवदान! 3 गरजू रूग्णांना मिळाले नवजीवन


Latur News : लातूरमधील 14 गावांमध्ये तब्बल 28 हजार वृक्षांची लागवड, हजारो नागरिकांचा सहभाग, मांजरा नदीकाठी यात्रेचे स्वरूप